यंदाच्या गुढीपाडव्याला राज ठाकरे करणार मोठी घोषणा, टीझर प्रदर्शित
राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्याचे रणशिंग फुंकले आहे. मनसेने या मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली आहे. या मेळाव्यात राज ठाकरे महापालिका निवडणुकांबद्दल महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता आहे.

राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकलं आहे. महापालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आयोजित केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर हा गुढीपाडवा मेळावा आयोजित केला जाणार आहे. या मेळाव्यात राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एक टीझर शेअर केला आहे. मनसेने त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक मिनिटाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत गुढीपाडवा मेळावा २०२५ आणि MNS Adhikrut असे नमूद करण्यात आले आहे.
मनसेच्या टीझरमध्ये काय?
मनसेने शेअर केलेल्या या व्हिडीओत राज ठाकरेंच्या नुकत्याच पार पडलेल्या वर्धापन दिनाच्या भाषणाचे काही मुद्दे ऐकायला मिळत आहे. “निछड्या छातीचा मराठी अभिमान”, “अभेद्य एकजूट” असे काही शब्दही पाहायला मिळत आहे. तसेच या भाषणादरम्यान त्यांनी मी येत्या ३० तारखेला बोलणार आहे, जल्लोषात, गुलाल उधळत सर्वांनी शिवतीर्थावर यावे, अशी मी विनंती करतो, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे. या गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गुढी उभारु!! असे आवाहन या व्हिडीओतून करण्यात आले.
#गुढीपाडवामेळावा२०२५#MNSAdhikrut pic.twitter.com/1H2TV5ZFOO
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) March 24, 2025
राज ठाकरे नेमके काय बोलणार?
मनसेचा १९ वा वर्धापन दिन सोहळा नुकताच चिंचवडमध्ये पार पडला. त्यावेळी राज ठाकरेंनी मी ३० तारखेला बोलणार, असे सांगितले होते. आता गुढीपाडवा मेळाव्याला फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे नेमके काय बोलणार, याकडे उभ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे. तसेच राज ठाकरे यावेळी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कोणती मोठी घोषणा करणार याकडेही सर्वांचे लक्ष आहे.