Raj Thackeray : औरंगाबादमधील राज ठाकरेंची सभा उधळून लावू; भीम आर्मीने काय दिला इशारा?
औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली, तर ही सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे. भीम आर्मीने म्हटले आहे की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला आमचा शेवटपर्यंत विरोध आहे. या सभेमुळे, राज यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार आहे.
औरंगाबादः औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली, तर ही सभा उधळून लावू, असा इशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे. भीम आर्मीने म्हटले आहे की, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेला आमचा शेवटपर्यंत विरोध आहे. या सभेमुळे, राज यांच्या चिथावणीखोर भाषणामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार आहे. हिंदू-मुस्लीम दंगली होणार आहेत, असे चित्र स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी (Police) अनेक ठिकाणी बंदोबस्त लावलेला आहे. जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिली, तर ती सभा आम्ही होऊ देणार नाही. राज यांची सभा उधळून टाकू. कोणत्याही परिस्थितीत औरंगाबादची सभा उधळून लावायचे काम आम्हीच करू. जो शाहू, फुले, आंबेडकरी विचारांचा पाईक आहे. तो प्रत्येक नागरिक या सभेला विरोध करत आहे, असा दावाही करण्यात आला आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेपूर्वीच वातावरण तापायला सुरुवात झालीय. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.
सभेला परवानगी मिळणार?
औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, पोलीस राज ठाकरे यांना नोटीस बजावणार आहेत. शिवाय त्यांच्यासमोर काही अटी आणि शर्थीही ठेवल्या जाणार आहेत. त्यानुसार सभेत ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे लागतील. लहान मुले, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी लागेल. इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी लागेल. सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्याने धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये, असे आवाहन करण्यात येणार आहे. व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी. सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये. वाहन पार्किंगचे नियम पाळावेत. सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही. सभेला येणार्या लोकांनी घोषणा देऊ नयेत. सामाजिक वातावरण, सलोखा बिघडेल असे कुठलेही वर्तन तयार करण्यात येऊ नये, यासह आणखी काही अटी सभेला लागू रहाणार आहेत.
राज काय बोलणार?
औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता लागली आहे. शिवतीर्थावर झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी भोंग्याचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे आतापर्यंत झालेली पळापळ उभ्या महाराष्ट्राने पाहिली. त्यावर गृहमंत्र्यांनीही आढावा बैठक घेतली. मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी राज यांनी तीन तारखेचा अल्टीमेटम दिला होता. तो ही आता संपत येतोय. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भूमिका काय असेल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. येणाऱ्या काळात मुंबईसह राज्यातल्या 18 महापालिका निवडणुका होतायत. त्यापूर्वी लाव रे तो व्हिडीओ म्हणक मोदींवर टीका करणारे राज ठाकरे, आता चक्क हिंदुत्त्वाच्या रथावर स्वार झालेत. त्यामुळे सारेच चित्र पालटले आहे.