Raj Thackeray : सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यास तुमच्याकडूनच वसूल करणार, मनसेच्या कार्यकर्त्यांना सरकारची तंबी
काही मनसे कार्यकर्ते अजून महाआरती करण्यावर आणि हनुमान चालीसा लावण्यावर ठाम आहेत. मात्र या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कराल तर तुमच्याकडूनच त्यांची वसुली केली जाईल, अशी तंबीही सरकारकडून मनसैनिकांना देण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात सध्या पोलिसांनी कायदा (Aurangabad Police) आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मनसे नेते (MNS) आणि कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. काही जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर काही ठिकाणचे मनसे नेते आणि कार्यकर्ते नॉटरिचेबल झालेत. राज ठाकरेंवर (Raj Thackeray) औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आता पोलीस चांगलेच अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. राज ठाकरे यांच्या अटकेचीही शक्यता आहे. तर काही मनसे कार्यकर्ते अजून महाआरती करण्यावर आणि हनुमान चालीसा लावण्यावर ठाम आहेत. मात्र या कार्यकर्त्यांनी पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कराल तर तुमच्याकडूनच त्यांची वसुली केली जाईल, अशी तंबीही सरकारकडून मनसैनिकांना देण्यात आली आहे. त्यामुळे मनसेच्या अडचणी आता वाढताना दिसून येत आहे. राज्यात सध्या मशीदीवरील भोंगे, हनुमान चालीसा, राज ठाकरेंचं भाषण, यावरून जोरदार पॉलिटिकल राडा सुरू आहे.
4 मेच्या इशाऱ्याचं काय होणार?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांना नोटीस बजावली आहे. यामध्ये मनसे नेत्यांच्या चिथावणीखोर वक्तव्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी सार्वजनिक मालमत्तेचे कोणत्याही प्रकारे नुकसान केल्यास त्याची भरपाई त्यांच्याकडून करण्यात येईल, असा कडक इशारा देण्यात आला आहे. 4 मे पासून म्हणजे उद्यापासून लाऊडस्पीकर लावून अजानच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं आहे. यामध्ये मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाणार आहे. मशिदीतून लाऊडस्पीकरवर होणारी नमाज बंद करावी, असं राज ठाकरेंचं म्हणणं आहे. अन्यथा मशिदींसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा पठण करु असा इशारा त्यांनी पुन्हा औरंगादेत दिला आहे. यापूर्वी यासाठी 3 मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र आज ईद डोळ्यासमोर ठेवून राज यांनी ती पुढे ढकलली.
राज ठाकरेंवर काय कारवाई होणार?
औरंगाबाद प्रकरणात राज ठाकरे, राजीव जेवळीकर आणि इतर रॅली आयोजकांवर कलम 116, 117, 153 आणि 1973 महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 नुसार कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक अशोक गिरी करीत आहेत. 1 मे च्या सभेत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना म्हटले की, माझ्या जाहीर सभांनी सरकारला धक्का बसला आहे. तर शांत बिघडवणाऱ्यांना सोडले जाणार नाही, असे महाराष्ट्र पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल. DGP रजनीश सेठ पत्रकार परिषदेत म्हणाले, औरंगाबादचे पोलिस आयुक्त भाषणाची चौकशी करत आहेत. ते आवश्यक कायदेशीर कारवाई करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यात सध्या हेच प्रकरण चर्चेत आहे.