‘नारायण राणेंना प्रचाराची किंवा माझ्या सभेची गरज नाही, कारण…’; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
कणकवलीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा झाली. नारायण राणेंच्या प्रचारासाठी ठाकरेंची तोफ कोकणात धडाडली. नारायण राणे यांना प्रचाराची गरज नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरेंनी याचं कारणही सांगितलं.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून उमेदवारी दिली आहे. महायुतीकडून नारायण राणे तर मविआकडून विनायक राऊत अशी लढत होणार आहे. नारायण राणे यांच्या प्रचारामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी बोलताना नारायण राणे यांना प्रचाराची किंवा माझ्या सभेची गरज नसल्याचं राज ठाकरे म्हणाले. याचं कारणही ठाकरेंनी सांगितलं तर आपल्या सभेमधून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला.
काय म्हणाले राज ठाकरे?
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात पाठिंबा जाहीर केला. तेव्हा फार काही मनात नव्हतं की कुठे सभा घ्याव्या लागतील. पण राणेंचा फोन आल्यानंतर मी त्यांना नाही म्हणू शकत नाही. कारण मी संबंध सांभाळणारा माणूस आहे. खरं तर नारायण राणेंना प्रचार सभेची आणि माझी मतदारसंघात यायची गरज नाही. ते निवडून आलेले आहेत. तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाही. हा सुंदर आणि देखणा प्रदेश आहे. इथली जनता सुजाण असल्याचं राज ठाकरे म्हणाले.
साधी गोष्ट पाहा, सुजाण या अर्थाने बोलतोय, राज्याला नऊ भारतरत्न आहेत. त्यापैकी नीट काढले तर जवळपास ७ भारतरत्न एकट्या कोकणातून जातात. पावा काणे, कर्वे, सचिन, लता मंगेशकर, विनोबा भावे, भीमसेन जोशी, बाबासाहेब आंबेडकर, बाबासाहेबांचा जन्म इंदोरचा. सर्व काही इथलं, चार भारतरत्न एकट्या दापोलीतील आहे. सुजाण मतदार आहेत. कोण काय करू शकतो ते त्यांना माहीत असल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
कोकणातील उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहे. 2014 ते 2019 त्यांच्यासोबत सत्तेत बसला होता. 2019मध्ये तुम्ही मुख्यमंत्री होता. तुम्ही दहा वर्षातील साडे सात वर्ष उद्धव ठाकरे सत्तेत होते. का नाही विरोध केला. उद्योगधंदा आला तर खासदार विरोध करणार आणि आमदार पाठिंबा देणार. आपण का विरोध करतो. माहीत आहे का माहित नाही? असा सवालही राज ठाकरेंनी केला.