लसीकरणासाठी राज्य सरकारची समिती, शितगृहाबाबत उणिवा- आरोग्यमंत्री
कोरोना लस निर्मितीसाठी एकूण 5 कंपन्या काम करत आहेत. त्यांचे क्लिनिकल ट्रायलही पूर्ण झाले आहेत. आता कोणत्या राज्यात कोणत्या कंपनीला परवानगी द्यायची हे केंद्राने ठरवायचं आहे. लसीकरणासाठी राज्यात एक की दोन कंपन्यांना परवानगी द्यायची हा अधिकार केंद्र सरकारचा असल्याचं टोपे म्हणाले.
मुंबई: देशातील प्रमुख कोरोना लस निर्मिती केंद्रांकडून लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्राकडून परवानगी मागण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आता लसीकरणासाठी राज्य सरकारनं तयारी सुरु केली आहे. राज्यात लसीकरणासाठी मुख्य सचिवांच्या स्तरावर एक समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. (Rajesh Tope’s information about preparations for corona vaccination)
कोरोना लसीकरणाचं काम मोठं आहे. त्यात वाहतूक, शितगृह आणि प्रशिक्षणाचा समावेश आहे. दरम्यान राज्यात शितगृहासंदर्भात काही उणिवा आहेत. त्यासंदर्भात डिसेंबर-जानेवारीपर्यंत यंत्रणा परवू, अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. आम्ही सर्व आकडेवारी केंद्राला दिली आहे. आता आम्ही केंद्र सरकार यंत्रणा कधी पुरवणार याची वाट पाहत आहोत, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे.
कोरोना लस निर्मितीसाठी एकूण 5 कंपन्या काम करत आहेत. त्यांचे क्लिनिकल ट्रायलही पूर्ण झाले आहेत. आता कोणत्या राज्यात कोणत्या कंपनीला परवानगी द्यायची हे केंद्राने ठरवायचं आहे. लसीकरणासाठी राज्यात एक की दोन कंपन्यांना परवानगी द्यायची हा अधिकार केंद्र सरकारचा असल्याचंही टोपे म्हणाले.
आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार
कोरोना लस आल्यानंतर सर्वात आधी आरोग्य कर्मचारी आणि पोलिसांना लस दिली जाणार असल्याचं टोपे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. त्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्याचं काम सुरु आहे. कालपर्यंत 90 हजार जणांची यादी तयार झाली आहे. आयएमएच्या माध्यमातून माहिती गोळा केली जात असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
लसीकरणासाठी प्रशिक्षणाचं काम सुरु
लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना दोन दिवसांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणाला आजपासून सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारनं आखून दिलेल्या सर्व वेळा आम्ही पाळत आहोत. त्याबाबत आम्ही पहिल्या क्रमांकावर असल्याचं टोपे यांनी आवर्जुन सांगितलं.
राज्यात कोरोनाची काय स्थिती?
राज्यात कोरोना चाचण्याचं प्रमाण वाढवण्यात आलं आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ते गरजेचं आहे. सूपर स्प्रेडर्सच्या चाचण्यांवर जास्त भर देत आहोत. कोरोनाची दुसरी लाट येऊ नये आणि आली तरी त्याला सामोरं जाता यावं यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु असल्याचं टोपे म्हणाले.
संबंधित बातम्या:
केईएम, नायरपाठोपाठ सायन रुग्णालयातही कोरोना लसीची चाचणी, 1 हजार स्वयंसेवकांचा सहभाग
Rajesh Tope’s information about preparations for corona vaccination