Raju Shetti महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?; 5 एप्रिलच्या मेळाव्यात घेणार निर्णय
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वाभिमानी क्रांती संघटनेचे नेते राजू शट्टी यांना भाजपमध्ये ऑफर दिली आहे. तर, महाविकास आघाडीत राहायचे की नाही याचा निर्णय येत्या 5 एप्रिल रोजी घेणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे.
इचलकरंजी: भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी स्वाभिमानी क्रांती संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांना भाजपमध्ये (bjp) ऑफर दिली आहे. तर, महाविकास आघाडीत राहायचे की नाही याचा निर्णय येत्या 5 एप्रिल रोजी घेणार असल्याची घोषणा राजू शेट्टी यांनी केली आहे. येत्या 5 एप्रिल रोजी पक्षाचा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात येणार असल्याचं राजू शेट्टी यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुका अवघ्या दोन वर्षावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे राजू शेट्टी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. हे सरकार जुल्मी सरकार आहे. शेतकरी, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यात हे सरकार अपयशी ठरले आहे. केवळ एकमेकांवर चिखलफेक करण्यात सत्ताधारी आणि विरोधक मग्न झाले आहे. त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रं यावं, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक होत आहे. यापार्श्वभूमीवर भाजप नेत्यांनी आज राजू शेट्टी यांची भेट घेऊन भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची विनंती केली. शेट्टी आणि भाजप नेते यांच्यात याबाबत तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र, शेट्टी यांनी भाजप नेत्यांना कोणतंही आश्वासन दिलं नाही. येत्या 5 एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यकारिणी मेळाव्यात याबाबतचा निर्णय घेऊ, असं शेट्टी यांनी भाजप नेत्यांना सांगितल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, राजू शेट्टी यांची भाजप नेत्यांनी भेट घेतल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे.
चंद्रकांतदादांची ऑफर
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी राजू शेट्टी यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. भाजपची काही ध्येय धोरणं राजू शेट्टींना पटली नव्हती. त्यावर चर्चा करू. पण मोदींवर टीका करू नका अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. पण ते बाहेर पडले. महाविकास आघाडी सरकार शेतकरी विरोधी आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी महाविकास आघाडी सोडली आणि भाजपसोबत येण्याचा विचार केला तर आम्ही त्यांचं स्वागत करू, असं पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आगामी काळात राजू शेट्टी काय राजकीय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संबंधित बातम्या:
संजय राऊतांवर बोलायचं नाही, त्यांना लई मोठं केलं; Chandrakant Patil यांचा टोला
महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी अडीच वर्षे थांबावे लागेल, भुजबळांचा Fadnavis यांना टोला
Holi Festival : “महापालिका निवडणुकीत आम्ही आमचे रंग दाखवू!”, एकनाथ शिंदेंचा होळीच्या दिवशी एल्गार