‘शरद पवारांच्या पायाजवळ बसण्यासाठी राजू शेट्टींचा कृषी कायद्यांना विरोध’
जू शेट्टी हे शरद जोशी यांच्या विचारावर चालत असते तर त्यांनी कृषी कायद्यांना कधी विरोध केलाच नसता. मात्र, आता राजू शेट्टी यांनी हे सर्व विचार गुंडाळून ठेवले आहेत. | BJP leader Anil Bonde
परभणी: केवळ शरद पवार यांच्या पायाशी बसण्यासाठी राजू शेट्टी (Raju Shetty) हे कृषी कायद्यांना (Farm Laws) विरोध करत आहेत. त्यांना आता केवळ विधानपरिषदेची आमदारकी दिसत असल्याची जळजळीत टीका राज्याचे माजी कृषीमंत्री आणि भाजप नेते अनिल बोंडे यांनी केली. (BJP leader Anil Bonde slams Raju Shetty over farm laws protest)
ते मंगळवारी परभणीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. यावेळी अनिल बोंडे यांनी राजू शेट्टी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. राजू शेट्टी हे शरद जोशी यांच्या विचारावर चालत असते तर त्यांनी कृषी कायद्यांना कधी विरोध केलाच नसता. मात्र, आता राजू शेट्टी यांनी हे सर्व विचार गुंडाळून ठेवले आहेत. त्यांनी शेतकऱ्यांचं स्वातंत्र्य गुंडाळून ठेवलंय. आता त्यांना केवळ विधानपरिषदेची आमदारकी दिसत आहे. त्यासाठी राजू शेट्टी हे कृषी कायद्यांना विरोध करत आहेत. जेणेकरुन आपल्याला महाविकासआघाडीत कुठेतरी स्थान मिळेल. यासाठीच राजू शेट्टींकडून लाळघोटेपणा सुरु असल्याचे अनिल बोंडे यांनी म्हटले.
‘बच्चू कडूंच्या मतदारसंघात शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आणि ते दिल्लीला गेलेत’
बच्चू कडू यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना अवकाळीचे पैसे मिळाले नाहीत. त्यांना पीक विमाही मिळाला नाही. शेतकऱ्यांचे डीपी बदलले जात नाहीत. संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. मात्र, हे सगळं सोडून बच्चू कडू दिल्लीत जातात. तिथे त्यांना कोणीही विचारत नाही. आपलं ठेवायंच झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, अशी बच्चू कडू यांची अवस्था असल्याची टीका अनिल बोंडे यांनी केली.
कृषी कायदे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य देणार: बोंडे
नव्या शेतकरी कृषी विधेयकाबाबत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र, नवीन कृषी कायद्यांमुशे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळेल, शेतमाल नियमन मुक्त केला असल्याने शेतकरी आपला माल कुठेही विकता येत असल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावा अनिल बोंडे यांनी केला.
शेतीत उत्पन्न येण्यापूर्वी शेतमालाचा करार कारखानदार, शेती प्रोड्यूसर कंपन्या शेतकऱ्यांशी करतील. बाजारभावाने शेतमालाची खरेदी करतील, असे विधेयक असून या कराराला कायदेशीर पाठबळ मिळाले आहे. कंपन्यांशी करार केला म्हणजे तुमची शेती हडप होईल, हा गैरसमज असल्याचे अनिल बोंडे यांनी सांगितले.
संबंधित बातम्या:
भाजपला टीकेबद्दल ‘भारतरत्न’ द्यायला हवा; संजय राऊतांची टोलेबाजी
Delhi farmers protest | आंदोलक शेतकऱ्यांचे थेट ब्रिटनच्या खासदारांना पत्र, काय आहे नेमकं कारण?
बच्चू कडूंना मुंबईत येण्यापासून रोखलं, नागपूरमध्ये चार तासांचा ड्रामा; वाचा सविस्तर रिपोर्ट
(BJP leader Anil Bonde slams Raju Shetty over farm laws protest)