मुंबई : राज्यसभेच्या (Rajyasabha Election) सर्व जागांचा सस्पेन्स आज अखेर संपला आहे. कारण सर्वच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. काँग्रेसने (Congress) सर्वात शेवटी आपला उमेदवार जाहीर केला आहे. तसेच त्यांनी इतर राज्यांसहीत सर्व उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. त्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीची रंगत आणखी वाढली आहे. शिवसेनेने आपले दोन उमेदवार संजय राऊत आणि संजय पवार हे जाहीर केले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडूनही प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपने आज आपले तीन उमेदवार जाहीर केले आहे. तर काँग्रेसने रात्री उशिरा उमेदवरांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसकडून जाहीर झालेलं नावं हे अपेक्षेप्रमाणेच सरप्राईजिंग आहे. कारण राज्यसभेसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातून इम्रान प्रतापग्रही (Imran Pratapgarhi) यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
भाजपने सुरूवातील आपले उमेदवार जाहीर करताना सावध पवित्रा घेत दोन नावं जाहीर केली. मात्र ऐनवेळी भाजपकडून आता धनंजय महाडिक हे तिसरे उमेदवार घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे आता सहा जागेसासाठी सात उमेदवार झाले आहे. तर सहाजिकच एका उमेदवाराला पराभवाच्या झळा सोसाव्या लागणार आहे. शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी चांगली तयारी करण्यात आली आहे अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवून शिवसेना ही जागा जिंकण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. तर आता भाजप कोणती खेळी करून अपेक्षित आकडा जमवण्याचा प्रयत्न करणार हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आता या निवडणुकीची रंगत सात उमेदवरांमुळे वाढली आहे. एवढं मात्र नक्की. यातून कोण बाहेर जाणार हेही चित्र लवकरच स्पष्ट होईल.