Chatrapti Sambhaji Raje : परप्रांतीय प्रियंका चतुर्वेंदींना संधी तर संभाजीराजेंना का नाही? राज्यसभेवरून मराठा समाज आक्रमक
संभाजीराजेंच्या उमेदवारीसाठी काही मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. परप्रांतीय असून शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेंदी यांना संधी मिळते तर संभाजीराजेंना का नाही मिळू शकत? असा सवाल आता संघटनांकडून करण्यात येतोय.
मुंबई : राज्यात सध्या छत्रपती संभाजीराजे (MP Chatrapati Sambhaji Raje) यांच्या उमेदवारीचा आणि खासदारकीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. सहा जागांसाठी सध्या राज्यसभेच्या निवडणुका (Rajyasabha election) लागल्या आहेत. त्यात खासदार संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याची हाक दिली आहे. तसेच आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहनही केले आहे. याबाबत संभाजीराजे यांनी दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Shivsena) यांची भेटही घेतली आहे. राष्ट्रवादीही संभाजीराजेंना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे. मात्र भाजपने अद्याप वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. तसेच हे निर्णय हे वरीष्ठ पातळीवरून होत असतात अशी सावध प्रतिक्रिया दिली आहे. मात्र संभाजीराजेंच्या उमेदवारीसाठी काही मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. परप्रांतीय असून शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेंदी यांना संधी मिळते तर संभाजीराजेंना का नाही मिळू शकत? असा सवाल आता संघटनांकडून करण्यात येतोय.
छत्रपतींचा सन्मान करण्याची संधी
करण गायकर, मराठा समन्वयक हे याबाबत बोलत होते, ते म्हणाले छत्रपती संभाजी राजे यांनी खासदार असतांना जी कामे केली तेपाहून त्यांना पुन्हा काम करण्याची संधी मिळावी. गडकिल्ले संवर्धन, कोपर्डीतील घटनेबाबत आवाज उचलण्याचे काम छत्रपती यांनी केले. सगळे शाहू, छत्रपती यांचे नाव घेतात आणि राजकारण करतात. तेव्हा छत्रपती संभाजी महाराज यांना अपक्ष उमेदवारी देत बिनविरोध निवडून द्यावे. अपक्ष आमदारांना कोणी घाबरविण्याचा प्रयत्न करू नये. तसेच शिवसेने कडून आम्हाला अपेक्षा आहे की शिवसेना छत्रपती यांचा सन्मान ठेवेल, असेही ते म्हणाले.
राजेंना संधी का नाही?
तर छत्रपती संभाजी राजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना,राष्ट्रवादी, भाजप यांनी संभाजी राजे यांना बिनविरोध निवडून द्यावे. दगा देण्याचा कोणी प्रयत्न करू नये राजकीय परिणाम होतील, असा कडकडीत इशाराही त्यांनी दिला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांना बिनविरोध निवडून देण्याची संधी सगळ्या पक्षांना आली आहे. संभाजी राजे यांच्या उमेदवारी बाबत कोणाचा आकस असेल तर सातवा उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न होईल. प्रियांका चतुर्वेदी परप्रांतीय असून त्यांना जागा दिली जाते मग संभाजी राजे यांना का नाही? असा सवाल त्यांच्याकडून विचारण्यात आलाय. तसेच आम्ही मराठा आमदार, प्रमुख यांना भेटून आमची भूमिका सांगणार आहोत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे आणि भाजपच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. येत्या काही दिवसातच हे चित्र स्पष्ट होईल.