Ram Mandir : पुणेकरांनो, रेल्वेने अयोध्येला जाताय ? आणखी वाट पहावी लागणार, गर्दीमुळे गाड्यांचे वेळापत्रक पुढे जाण्याची शक्यता
Ayodhya Ram Mandir | अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. भाविकांच्या सोयीसाठी 30 जानेवारीपासून पुण्यातून अयोध्येसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार होत्या. मात्र आता या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता असून भविकांना आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते.
पुणे | 29 जानेवारी 2024 : गेल्या सोमवारी, २२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पूजा झाली. या सोहळ्यासाठी देशातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्या दिवसापासून सर्वसामान्य जनतेसाठी हे मंदिर खुले करण्यात आले. देशभरातील भाविक या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. पुणेकरानांही अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेता यावे यासाठी पुण्यातून अयोध्यासाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. 30 जानेवारीपासून या गाड्या सोडण्यात येणार होत्या, मात्र आता या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता असून पुण्यातील भविकांना आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते.
अयोध्येतील गर्दीमुळे या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळेच पुण्याहून ज्या भाविकांना अयोध्येला जाण्याची इच्छा आहे, त्यांना आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते. त्यामुळे पुणेकरांचा हिरमोड होऊ शकतो.
वाढत्या गर्दीमुळे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता
गेल्या आठवड्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचा सोहळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच लाखो भाविकांनी अयोध्येत जाऊन दर्शन घेण्यास सुरूवात केली. अयोध्याला जाण्यासाठी विशेष गाड्या सोडण्याची मागणी राम भक्तांकडून केली जात होती. त्यानुसार रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला. 30 जानेवारीपासून पुण्यातून अयोध्येसाठी 15 विशेष गाड्या सोडल्या जाणार होत्या. एका गाडीमधून साधारण दीड हजार प्रवासी अयोध्याला जाऊ शकतील अशी सोय होती. मात्र अयोध्येमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. लाखो भाविक रोज राम मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. गर्दीमुळेच या गाड्यांचे वेळापत्रक पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे.
इंडियन रेल्वे केटरिंग टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) या गाड्या सोडणार आहे. मात्र या एकट्या प्रवाशाला तिकीट आरक्षित करता येणार नाही. प्रवाशांचा समूह असेल तरच तिकिट आरक्षित करता येईल. यासाठी किमान 15 प्रवाशांचा समूह असणे आवश्यक आहे. अयोध्येतील गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या गाड्यांचे वेळापत्रक काही दिवस पुढे ढकलण्याचे रेल्वेचे नियोजन आहे. म्हणूनच पुण्यातील भक्तांना अयोध्येला जाण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते. पण यामुळे पुण्यातील भक्तांचा हिरमोड झाला असेल हे नक्की. या गाड्या आता नेमक्या कधी सुटतील याबद्दल स्पष्ट माहिती अद्याप मिळालेली नाही.