बारामतीत सुप्रिया सुळेंची हॅटट्रिक, कांचन कुल यांचा पराभव
बारामती लोकसभा निकाल Baramati Lok sabha result 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी हॅटट्रिक केली आहे. दुपारी साडेबारापर्यंत सुप्रिया सुळेंनी जवळपास 1 लाख मतांची आघाडी घेतली. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीट मतांची मोजणी झाल्यानंतर सुप्रिया सुळेंच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या मतदारसंघात त्यांना भाजपकडून कांचन कुल यांनी आव्हान दिलं […]
बारामती लोकसभा निकाल Baramati Lok sabha result 2019 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी हॅटट्रिक केली आहे. दुपारी साडेबारापर्यंत सुप्रिया सुळेंनी जवळपास 1 लाख मतांची आघाडी घेतली. ईव्हीएम आणि व्हीव्हीपीट मतांची मोजणी झाल्यानंतर सुप्रिया सुळेंच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या मतदारसंघात त्यांना भाजपकडून कांचन कुल यांनी आव्हान दिलं होतं.
सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांच्यावर आघाडी घेत दुपारपर्यंत विजय निश्चित केला. बारामती जिंकण्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली होती. राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर सुप्रिया सुळेंना पराभूत करण्यासाठी बारामतीत तळ ठोकून होते.
बारामती तालुका आणि परिसर पवार कुटुंबीयांची कर्मभूमी आहे. पवार म्हणजेच बारामती असे समीकरण गेले 50 हून अधिक वर्षे भारतीय राजकारणत दृढ झालं आहे. त्यामुळे बारामतीतल्या विजयाकडे राज्याच्या राजकारणासह संपूर्ण देशाचं लक्ष असतं. अजित पवार, शरद पवार यांनी नेतृत्त्व केलेल्या बारामती लोकसभा मतदारंसघाचं 2009 पासून शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे प्रतिनिधित्व करतात.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषत: पवार कुटुंबींयांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने दौंडचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा,नितीन गडकरी, स्मृती इराणी, देवेंद्र फडणवीस, सुभाष देशमुख, सदाभाऊ खोत आदी नेत्यांच्या सभाही या मतदारसंघात घेण्यात आल्या. पवार कुटुंबीयांना लक्ष्य करत या सर्वच नेत्यांनी मतदारांना परिवर्तनासाठी साद घातली.
मागील निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना मताधिक्य मिळालं, त्या ठिकाणीही विशेष यंत्रणा राबवून मताधिक्य घटवण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला. एकूणच पवार कुटुंबीयांना पर्यायाने राष्ट्रवादीला कोंडीत पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न भाजपकडून करण्यात आले.
2014 साली काय स्थिती होती?
2014 सालीही बारामतीत महायुतीकडून विजयासाठी जोर लावण्यात आला होता. महायुतीतले मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी 2014 साली सुप्रिया सुळे यांना टक्कर दिली होती. सुप्रिया सुळे यांना 5 लाख 51 हजार 562, तर महादेव जानकर यांना 4 लाख 51 हजार 843 मतं मिळाली होती. केवळ 69 हजार 719 मतांच्या फरकाने सुप्रिया सुळे यांचा विजय झाला होता.