परभणी बंदला हिंसक वळण; रामदास आठवले यांचं आंबेडकरी अनुयायींना महत्त्वाचं आवाहन
Ramdas Athawale on Parbhani News : रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी परभणीतील आंबेडकरी अनुयायींच्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आंबेडकरी अनुयायींना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. तसंच फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावरही आठवलेंनी भाष्य केलंय. वाचा सविस्तर...
परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधानाच्या प्रस्ताविकेची काल समाजकंटकाकडून विटंबना करण्यात आली. याच्या निषेधार्थ आज परभणी बंदची हाक देण्यात आली. या बंदला हिंसक वळण लागलं. परभणीत जाळपोळीची घटना घडली. त्यानंतर रिपाइंचे नेते रामदास आठवले यांनी आंबेडकरी अनुयायींना महत्त्वाचं आवाहन केलं आहे. परभणी मराठवाड्यातील महत्वाचं शहर आहे. तिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे. कोणी माथेफिरूने संविधान आणि बाबासाहेब यांचा अपमान केला. आरोपी पकडला गेला आहे. मात्र त्याच्या मागे कोण आहे का याची चौकशी व्हावी. मी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील दिल्लीत बोलणार आहे. मी आंबेडकरी अनुयायांना आवाहन करतो की, त्यांनी शांतता राखावी, असं रामदास आठवले म्हणालेत.
रामदास आठवले काय म्हणाले?
परभणीत झालेला प्रकार निंदनीय आहे. बाबासाहेब यांच्याबद्दल सगळ्यांना आदर आहे. अशा संतप्त प्रतिक्रिया येणे अपेक्षित आहे. बाबासाहेब यांच्या पुतळ्या बाबत घडलेली घटना अनेक दिवसांनी घडली आहे. अनेक ठिकाणी बाबासाहेब यांचे पुतळे आहेत. ते उभे करण्यात मराठा समाजाचा देखील मोठा सहभाग आहे. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, शिवाजी महाराज या कोणत्याही महापुरुषाच्या पुतळ्यांची विटंबना होऊ नये. यामामगे ज्याचा हात असेल त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री या प्रकारांची चौकशी करून आरोपींना शिक्षा करतील हा विश्वास आहे, असं आठवले म्हणाले आहेत.
ईव्हीएमच्या मुद्द्यावर आठवले काय म्हणाले?
राजधानी दिल्लीत शरद पवार यांच्या घरी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत ईव्हीएम आणि विधानसभा निवडणुकीवर चर्चा झाली. यावर रामदास आठवलेंनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुका या लोकशाही पद्धतीने झाल्या आहेत. EVM ही काँग्रेस काळात आणली आहे. तुम्हाला चांगल्या जागा मिळाल्या की EVM चांगल बाकी वेळी त्यावर आक्षेप घेता. शरद पवार अनुभवी नेते आहेत. आपला पराभव त्यांनी मान्य करावा. EVM मशीन वर आमचा विश्वास आहे. ती असायलाच हवी. बॅलेट पेपरवर निवडणूक झाली की मतमोजणीला किती वेळ जातो. त्यांना सत्ता मिळाली तरी EVM मशीन हवी आहे, असं आठवले म्हणाले.
देशाला पुढे घेऊन जायचं असेल तर देशात एकदाच निवडणूक झाली पाहिजे. माझ्या पक्षाचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे. जेव्हा राज्यसभेत बिल येईल तेव्हा मी माझ्या पक्षाच्या वतीने पूर्ण पाठिंबा देणार आहे, असंही आठवले म्हणाले.