‘या’ मुद्द्यावरून नारायण राणे आणि रामदास कदम यांचे झाले एकमत, म्हणाले ‘मराठा – कुणबी…’
मराठा समाजाला न्याय मिळावा याबाबत दुमत नाही. २०० ते ३०० कोटी खर्च करा. पण, मराठा समाजाचा सर्व्हे करा. मनोज जरांगे पाटील याचा अभ्यास चांगला आहे. पण. थोडा कच्चा आहे. जरांगे यांना काही गोष्टी माहित नाहीत.
रत्नागिरी, खेड | 21 ऑक्टोंबर 2023 : विधानसभा अध्यक्ष यांच्या निर्णयाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कुणाचे आमदार अपात्र होतील हा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील. यापूर्वी न्यायालयाने विधिमंडळाच्या कामांमध्ये कधी हस्तक्षेप केला नव्हता. मात्र, सातत्याने सर्वोच्च न्यायालय हे आता अध्यक्षांना आदेश देत आहे. ही लढाई अंतिम टप्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडे जे कायदे पंडित आहेत. ज्यांच्यामुळे शिवसेना फुटली. त्याचे दोन भाग झाले. त्याचेच उद्धव ठाकरे सगळे ऐकत आहेत. निवडणूक आयोगाने जसा निर्णय घेतला तसाच निर्णय जर अध्यक्ष यांनी घेतला तर ते ठाकरे गटाचे १५ आमदार अपात्र होतील, असे शिवसेना नेते ( शिंदे गट) रामदास कदम यांनी सांगितले.
माझे आडनाव काय जोशी नाही की मी ज्योतिषी नाही. पण, अशा पद्धतीने अध्यक्ष यांच्यावर अविश्वास दाखवणे योग्य नाही. जो काही निकाल येईल तो येईल. उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागला तर एकनाथ शिंदे सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतील. तर, एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल लागला तर उद्धव ठाकरे बाजूला जे आमदार आहेत ते पुन्हा न्यायालयात जातील असा माझा अंदाज आहे असे ते म्हणाले.
तर उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र होतील
विधानसभा अध्यक्ष यांनी हा खेळ एकदाचा संपवून टाकावा. काय निर्णय द्यायचा असेल तर तो लवकर द्यावा. ज्यांना कुणाला कोर्टात जायचे असेल ते कोर्टात जातील. ज्यांना घरी बसायचे असतील ते घरी बसतील. पण, लवकर निर्णय घ्या. जो निर्णय निवडणूक आयोगाने घेतला तोच निर्णय जर अध्यक्षांनी घेतला तर उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र होतील, असेही त्यांनी सांगितले.
चिपळूणमधील पूल दुर्घटना
चिपळूणमधील पूल दुर्घटनास्थळी राजकीय पक्षांचे नेते भेट देत आहेत. पण, यामुळे भीतीने कर्मचारी बिथरले आहेत. त्यांनी येथून पलायन केले आहे. चिपळूण उड्डाणपूल कोसळल्यानंतर सेफ्टी इंजिनिअरला झालेल्या मारहाणीचा कामगारांनी धसका घेतला आहे. कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणची परिस्थिती पूर्ववत करण्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे मोठे आव्हान आहे. उर्वरित गर्डर खाली उतरण्याचे काम बाकी आहे. मात्र, राजकीय पक्षांच्या आंदोलनांना घाबरून कर्मचारीच गायब झाल्याने प्रशासन हैराण झाल्याचे कदम यांनी सांगितले.
मराठा समाजाला न्याय मिळावा याबाबत दुमत नाही
मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा झाली. मराठा समाजाला न्याय मिळावा याबाबत दुमत नाही. मराठा समाज किती मागसलेला आहे हे दाखवून द्या असे कोर्टाने म्हटले आहे. मराठा समाजाचा सर्व्हे केला आणि सर्वोच्च न्यायालयाला ते पटले तर लगेच आरक्षण मिळेल. २०० ते ३०० कोटी खर्च करा. पण, एकदा सर्व्हे करा. मराठवाड्यात किती मराठा समाजाच्या शेतकऱ्यांनी जीवन संपवले त्याची माहिती कोर्टाला दिली तरी आरक्षण मिळेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सांगितले असे ते म्हणाले.
काही राजकीय शक्तींचा हात
केंद्रीय मंत्री नारायण यांनी दोन दिवसांपूर्वीच कोकणातील मराठा समाज कुणबी जातीचे दाखले घेणार नाही असे म्हटले होते. यावर रामदास कदम यांनीही आपली तीच भूमिका असल्याचे सांगितले. मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे पाटील याचा अभ्यास चांगला आहे. पण. थोडा कच्चा आहे. विदर्भ, मराठवाडा येथील मराठे कुणबी प्रमाणपत्र घेतील. पण, कोकणात कुणबी मराठा रोटी बेटी व्यवहार होत नाही. जरांगे यांना हे माहित नाही. त्यामुळे कोकणातील मराठे असे कुणबी प्रमाणपत्र घेणार नाहीत असे कदम म्हणाले. सरकारला अडचणीत आणण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत. जरांगे यांच्या उपोषणामागे काही राजकीय शक्तींचा हात आहे असा आरोपही रामदास कदम यांनी केला.