Raosaheb Danve: शिवसेनेने दिवसाढवळ्या बगावत केली, सत्ता गेल्याचं नाही, धोका दिल्याचं दु:ख; रावसाहेब दानवेंचा हल्लाबोल
Raosaheb Danve: राज्यात सरकार आमचंच आले होतं. आम्ही शिवसेना-भाजप युतीलाच मते मागितली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीसच पुढचे मुख्यमंत्री असतील असं वारंवार सांगितलं होतं.
मुंबई: राज्यात सरकार आमचंच आले होतं. आम्ही शिवसेना-भाजप युतीलाच मते मागितली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा प्रत्येक सभेत देवेंद्र फडणवीसच (devendra fadnavis) पुढचे मुख्यमंत्री असतील असं वारंवार सांगितलं होतं. तेव्हा शिवसेनेचे (shivsena) नेतेही मंचावर असायचे. त्यामुळे लोकांनी आम्हाला मते दिली. पण यांनी दिवसाढवळ्या बगावत केली. दगाफटका केला. काँग्रेस, राष्ट्रवादीशी युती केली आणि त्यांचं सरकार आलं, असं सांगतानाच सरकार गेल्याचं दु:ख नाही. तुम्ही धोका दिल्याचं दु:ख आहे. आम्ही 35 वर्ष विरोधात होतो. मी 35 वर्ष आमदार खासदार आहे. मी काही सत्तेत नव्हतो. लोकांनी युतीला डोळ्यासमोर ठेवून मतदान दिलं. मात्र आमच्याशी आणि मतदारांशी धोका झाला, अशी टीका केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी केली. तसेच त्यांच्यातून एखाद्याला धोका झाला असेल आणि आम्हाला येऊन मिळाला असेल तर आमचा काय दोष? असा टोलाही त्यांनी पहाटेच्या शपथविधीवरून लगावला.
रावसाहेब दानवे यांनी टीव्ही 9शी बोलताना हा हल्ला चढवला. शिवसेनेचं बेगडी हिंदुत्व आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत हे शिवसेनेला सांगायची वेळ आली. त्यातच ते बेगडी हिंदुत्वादी आहेत हे स्पष्ट होतं. आमचे नेते दत्तोपंत ठेंगडी होते. त्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशात जायचो. तेव्हा ते एक उदाहरण द्यायचे. ते म्हणायचे, पूर्वी दुकानावर तुपाचे दुकान अशी पाटी असायची. आता शुद्ध तुपाचे दुकान अशी पाटी असते. याचा अर्थ भेसळ आहे हे स्पष्टच आहे. शिवसेनेचं ही तसंच आहे. हिंदुत्व सोडलं नाही हे शिवसेना सांगते. याचा अर्थ त्यांनी हिंदुत्व सोडलं आहे. तुम्ही हिंदू आहात, हिंदुत्ववादी आहात तर सांगायची गरज का पडते? काही शंका आहे का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना आम्ही हिंदुत्वावादी आहोत हे सांगाव लागत नव्हते. उलट लोकच त्यांना हिंदूहृदयसम्राट म्हणत होते, असं दानवे म्हणाले.
हे म्हणतील तसे वागणारे राज ठाकरे आहेत का?
राज ठाकरे आमच्या बाजूने बोलले तर त्यांच्या पोटात दुखतं. आमच्याविरोधात बोलले तर त्यांना आनंद वाटतो. मोदींवर टीका केली तर त्यांना आनंद वाटतो. मोदींवर टीका केल्यावर उद्धव ठाकरे ते शरद पवारांनी त्यांचं कौतुक केलं. आज ते आमच्या बाजूने बोलले तर यांच्या पोटात दुखू लागलं. पाच राज्यांपैकी चार राज्य भाजपने जिंकले. मोदी आणि योगींनी करून दाखवलं. त्यांनी विकास केला म्हणून लोकांनी निवडून दिलं. राज यांनी हेच बोलून दाखवलं. त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलं. आमच्या नेतृत्वाचं कौतुक केलं. लोकांनीही आमच्या नेतृत्त्वावर शिक्कामोर्तब केलं आहे. यांच्याविरोधात ते बोलेले नाही. आमचं कौतुक केलं. यांच्याविरोधात बोलले तर त्यांना राग आला पाहिजे. पण तेही झालं नाही. म्हणजे हे म्हणतील तसे वागणारे राज ठाकरे आहेत का? असं होऊ शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Devendra Fadnavis: महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे का?; फडणवीस काय म्हणाले?