Raosaheb Danve : आमचं ठरलंय, लोकसभा माझी, विधानसभा अर्जुन खोतकरांची, रावसाहेब दानवेंनी सर्वच उलगडून सांगितलं
आमचं ठरलंय अर्जुन खोतकर यांनी विधानसभा बघायची आणि मी लोकसभा असे म्हणत दानवेंनी जालन्यातल्या राजकारणाची पुढची दिशा पूर्णपणे उलगडून सांगितली आहे. लोकसभेची जागा ही पारंपारिक भाजपची जागा आहे.
मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर राजकारणाची पूर्ण समीकरणं बदलून टाकली आहेत. अनेक जिल्ह्यातील नेते आता शिंदे गटात प्रवेश करत आहेत. तर अनेक बडे नेते आधीच शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतली स्थानिक लेव्हलची समीकरणंही बदलत आहेत. एकेकाळचे कट्टर विरोधक असणारे रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) आणि अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आता युतीत आल्यामुळे जालन्यातल राजकारणी बदलताना पाहायला मिळतंय. आमचं ठरलंय अर्जुन खोतकर यांनी विधानसभा बघायची आणि मी लोकसभा असे म्हणत दानवेंनी जालन्यातल्या राजकारणाची पुढची दिशा पूर्णपणे उलगडून सांगितली आहे. लोकसभेची जागा ही पारंपारिक भाजपची जागा आहे. त्यामुळे मी ती सोडू शकत नाही, असेही दानवेंनी यावेळी स्पष्ट केलंय.
विचारांचा लढा हाणामारीवर येऊ नये
तर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात पाठीमागच्या काळात जो संघर्ष झाला आहे. त्याबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले राजकारणात काम करताना गटबाजी होते. ही विचारांची लढाई आहे. विचारांचा लढा हाणामारीवर येणारा नसावा, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असे म्हणत त्यांनी उदय सामंत यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याबाबतही टोल लगावला आहे.
आता निष्ठा आठवली का?
तर आज ठाकरे सांगत आहे ते गद्दार आहेत. मात्र ज्या माणसांनी मोदींवर विश्वास ठेवून मतं दिली आणि नंतर ते त्यांच्याबरोबर गेले गद्दारी नाही का? असा सवालही त्यांनी केलाय. हे आता म्हणत आहेत निष्ठेचं दूध पाजलं, यांनाही कोणीतरी निष्ठेचे दूध पाजलं, असेही दानवे म्हणाले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी भाजप आणि शिवसेनेची युती घडवून आणली. त्यावेळी ठरलं होतं, ज्यांचे जास्त आमदार असतील त्यांचाच मुख्यमंत्री होईल, त्यावेळी शिवसेनेचे आमदार जास्त आले, तेव्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. मग नंतर कोणाबरोबर गेले तेव्हा नाही का निष्ठा आठवली? आत्ताच का निष्ठा आठवली? असा सवालही दानवेंनी ठाकरेंना केलाय.
परीवारवादी पार्टी संपतील
तसेच कोर्टातील सुनावणी बाबत बोलताना ते म्हणाले कोर्टात काय निर्णय होईल, याबाबत मी आज सांगू शकत नाही. मात्र कायद्याला धरून कोर्ट निर्णय देईल. या देशात भाजप आणि काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहेत. मात्र आता नव्याने परिवारवादी पक्ष निर्माण झालेत. आमच्या पक्षाचे मत असे आहे की राष्ट्रीय पक्षाला एक दिशा असते. राज्यात शिवसेना ही परिवारवादी पक्ष आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनाही संपेल हे जेपी नड्डा यांचं वक्तव्य बरोबरच आहे, असा दुजोरा त्यांनी दिला आहे.