लोकसभेसाठी महादेव जानकर यांच्या नावाची चर्चा असतानाच ते चहाच्या स्टॉलवर…
बारामती लोकसभेच्या जागेसाठी महादेव जानकर यांचेच नाव चर्चेत आहे.
पुणे : राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर हे आज पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती आहेत. यावेळी रुई गावाला जात असताना लोणी देवकर या गावी रस्त्याच्या किनारी असलेल्या गुळाच्या चहाच्या स्टॉलवर थांबत जानकर यांनी गुळाचा चहा बनवीत चहा पिण्याचा आनंद घेतला. बारामती लोकसभेच्या जागेसाठी महादेव जानकर यांचेच नाव चर्चेत आहे.
भाजपच्या मिशन बारामतीला राष्ट्रीय समाज पक्षाकडूनच सुरुंग लावला जाण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभेच्या जागेसाठी महादेव जानकर हेच उमेदवार असतील अशी माहिती रासपचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांची दिली.
महादेव जानकर यांच्या उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील रुई गावी झाला शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी त्यांनी रासप पक्षातर्फे जानकर याचे नाव जाहीर केले.
बारामती लोकसभा जिंकायची ताकद फक्त आणि फक्त महादेव जानकर यांच्या मध्येच आहे. राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे बारामती लोकसभेसाठी महादेव जानकर हेच राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार असतील अशी माहिती राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते यांनी दिली.
राष्ट्रीय समाज पक्ष हा पूर्वाश्रमीचा भाजप युतीचा घटक पक्ष आहे. भाजपने मिशन बारामती हाती घेतलेले असतानाच घटक पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीच बारामती लोकसभा मतदारसंघावर उमेदवार देणार असल्याचे जाहीर केल्याने भाजपच्या मिशनला अंतर्गतच सुरंग लागल्याचे दिसत आहे.