Ratnagiri Dogs Video : शासकीय विश्रामगृहात व्हीआयपी सूटमध्ये एसीत चक्क कुत्र्याची जोडी, ‘समर्थाघरचे श्वान, त्यासी सर्वही देती मान’,
पत्रकारांनी या कक्षाच्या खिडकीतून आत पहिले असता, त्यांना ज्या बेडवर मंत्री, मोठे अधिकारी यांसारखे महत्वाचे मान्यवर आराम करतात, त्याच बेडवर कुत्रे बसून आराम करत असल्याचे पाहायला मिळाले. हे बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला नसता तरच नवल.
दापोली : सरकारी विश्रामगृहांचा (Government Rest House) वापर कशा प्रकारांसाठी केला जातो, याचे एक उदाहरण दापोलीत समोर आले आहे. दापोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहात व्हीआयपी (VIP) सूटमध्ये एसीत चक्क कुत्र्याची जोडी (Dogs) आराम करत होती. त्यांना एसी रुममध्ये तेही व्हीआयपी कक्षात पाहून पत्रकारांना आश्चर्याचा धक्काच बसला. या कुत्र्यांच्या जोडीला एसीत ठेवून त्यांचे मालक बाहेर फिरायला गेल्याची माहिती नंतर समजली. शासकीय विश्रामगृहांचा कसा दुरुपयोग केला जातो हे या निमित्ताने उघड झाले आहे. गुरुवारी दुपारी काही पत्रकार दापोली येथील शासकीय विश्रामगृहात गेले असताना, त्यांना या विश्रामगृहातील व्हीआयपी सूटमधून कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. पत्रकार या कक्षाजवळ गेले असता या कक्षाला बाहेरून कुलूप असल्याचे दिसले, तसेच या सूटमधील एसीही सुरूच असल्याचे एसीच्या आवाजावरून त्यांच्या लक्षात आले. पत्रकारांनी या कक्षाच्या खिडकीतून आत पहिले असता, त्यांना ज्या बेडवर मंत्री, मोठे अधिकारी यांसारखे महत्वाचे मान्यवर आराम करतात, त्याच बेडवर कुत्रे बसून आराम करत असल्याचे पाहायला मिळाले. हे बघून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला नसता तरच नवल.
श्वानांचा व्हिडिओ
दापोलीच्या शासकीय विश्रामगृहात व्हीआयपी सूटमध्ये बेडवर एसीत आराम करत होती चक्क कुत्र्याची जोडी…. pic.twitter.com/wOD3gRoLFa
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi Live (@tv9_live) May 12, 2022
सूट नेमका कुणा अधिकाऱ्याला दिलेला, हे गुलदस्त्यातच
पत्रकारांनी त्यानंतर यासंदर्भात विश्रामगृहाच्या कर्मचाऱ्यांकडे विचारमा केली. हा व्हीआयपी सूट नेमका कुणाला दिला आहे, अशी विचारणा तिथल्या कर्मचाऱ्यांना करण्यात आली. त्यानंतर सूटचे बुकिंग तहसीलदार दापोली यांच्या पत्रानुसार करण्यात आले असल्याचे उत्तर देण्यात आले. ८ ते ११ मे या कालावधीपर्यंत या सूटचे बुकिंग करण्यात आले असल्याची माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांनी दिली. आलेल्या अधिकाऱ्याची, मान्यवरांची नोंद विश्रामगृहाच्या नोंदवहीत करण्यात आली आहे का, अशी विचारणा केली असता सूट सोडताना ही नोंद केली जात असल्याचे सांगत सूट नेमका कुणाला दिला गेला आहे, याचे उत्तर कर्मचाऱ्यांनी दिलेच नाही. त्यामुळे हा सूट नक्की कोणाला दिला गेला आहे, ही माहिती गुलदस्त्यातच राहिली.
सार्वजनिक बांधकाम खात्याची सारवासारव
या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभियंता पटेल यांच्याशी संपर्क साधला असता, या ठिकाणी अधिकाऱ्यांचे बुकिंग ११ मे पर्यंतच होते, आम्ही त्यांना हा सूट सोडण्यासंदर्भात सांगितले होते, मात्र त्यांनी काल हा सूट सोडला नाही. असे उत्तर देत या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कुत्रे सोबत आणणार याची माहिती न्वहती, उपविभागीय अधिकाऱ्यांची भूमिका
या संदर्भात दापोलीचे उपविभागीय अधिकारी शरद पवार म्हणाले की, सूटमध्ये आलेले अधिकारी कुत्रे घेऊन येणार आहेत हे मला माहित नव्हते, आज सकाळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पटेल यांनी हे अधिकारी कुत्रे घेऊन आले असल्याची माहिती दिली, असे सांगत त्यांनीही या प्रकरणात बचावाचा पवित्रा घेतला.
एकीकडे वीजटंचाई, दुसरीकडे श्वानांना एसी
राज्यात एकीकडे विजेची भीषण टंचाई सुरु आहे. अनेक ठिकाणी भारनियमन होते आहे. सामान्य जनता या प्रकाराला त्रस्त आहे. असे असतानाही शासकीय विश्रामगृहातील व्हीआयपी सूटमध्ये कुत्र्यांना एसीत ठेवून स्वत: बाहेर फिरायला जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या वर्तनाची चर्चा सध्या सुरु आहे.