लोणावळ्यापाठोपाठ रत्नागिरीतील पर्यटन स्थळांवर कडक नियमावली, CCTV ची असणार करडी नजर

| Updated on: Jul 03, 2024 | 3:09 PM

रत्नागिरीतील एकूण 68 धरण प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चार मोठ्या धरणांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.

लोणावळ्यापाठोपाठ रत्नागिरीतील पर्यटन स्थळांवर कडक नियमावली, CCTV ची असणार करडी नजर
Follow us on

Ratnagiri Tourist Place Rules : लोणावळ्याचे भुशी डॅम हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. याच भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. भुशी डॅम परिसरात असणाऱ्या धबधब्यावर भिजण्याचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी अन्सारी कुटुंब उतरलं होतं. यावेळी पाऊस कोसळत होता. अचानक धबधबा असलेल्या भागात पाण्याचा प्रवाह वाढला आणि अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेले. या घटनेनंतर आता विविध पर्यटनस्थळी कडक नियमावली तयार करण्यात आली आहे.

मोठ्या धरणांवर सीसीटीव्हीद्वारे नजर

लोणावळा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील पाटबंधारे विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे. रत्नागिरीत लोणावळ्यासारखी दुर्घटना घडू नये, यासाठी पाटबंधारे विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. रत्नागिरीतील एकूण 68 धरण प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चार मोठ्या धरणांवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे.

रत्नागिरीत पावसाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना धरणावर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच धरणाच्या सांडव्याच्या ठिकाणी पाटबंधारे विभागाकडून चौकीदारांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच वर्षा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी धरणाच्या पाण्यात उतरु नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

सध्या रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 21 धरण ओव्हर फ्लो झाली आहेत. पण लोणावळ्यात झालेली दुर्घटना लक्षात घेता आणि या प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत.

लोणावळ्यात मोठी दुर्घटना

दरम्यान पुणे शहरातील अन्सारी आणि खान कुटुंब लोणावळ्यात पावसाळी पर्यटनासाठी आले होते. चार दिवसांपूर्वीच म्हणजेच २७ जून रोजी या कुटुंबाकडे लग्न होते. त्यानंतर दोन दिवसांनी २९ जून रोजी वलिमाचा (लग्नानंतर रिसेप्शनचा कार्यक्रम) कार्यक्रम झाला. मग लग्नसाठी आलेल्या पाहुण्यांनी पर्यटनास जाण्याचा बेत ठरवला. पुणे शहराजवळ असलेल्या लोणावळा येथील निसर्गरम्य स्थळाला भेट देण्याचे ठरले. त्यानुसार ३० तारखेला या कुटुंबियातील १७ जणांनी एका खासगी ट्रव्हल्सने लोणावळा गाठले. लोणावळ्यात दुपारी १२ वाजता पोहचले.

सर्व जण पर्यटन आणि धबधब्यांचा आनंद घेत होते. त्यापैकी काही जण पाण्याच्या प्रवाहाच्या मधोमध जाऊन पाण्यात चिंब भिजण्याचा आनंद लुटत होते. परंतु अचानक काही वेगळे घडले आणि त्या पाचही जणांचा मृत्यू झाला. त्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.