शिंदेंची देशात गद्दार म्हणून ओळख, तीन जिल्ह्यात सुद्धा त्यांना कोणी ओळखत नव्हतं; रत्नागिरीत उद्धव ठाकरे यांचा जोरदार हल्लाबोल
बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. याशिवाय रिफायनरीला कडाडून विरोध देखील दर्शवला आहे.
रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात ग्रामस्थांची चर्चा करण्यासाठी उद्धव ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान बारसू रिफायनरीच्या संदर्भात ग्रामस्थांची भावना जाणून घेत उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही अशी भूमिका घेत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देशात गद्दार म्हणून ओळख असून त्यांना तीन जिल्ह्यात देखील कोणी ओळखत नव्हतं असा टोला लगावत उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्पावरून थेट एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे.
सोलगावात उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत असताना एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. याच वेळेला बारसू येथील प्रकल्प गुजरातला घेऊन जा आणि आमचा गुजरातला गेलेला प्रकल्प पुन्हा आणून द्या असं आवाहन करत बारसू येथे रिफायनरी प्रकल्प होणार नाही असा थेट इशारा दिला आहे.
उद्धव ठाकरे आज रत्नागिरी दौऱ्यावर असून बारसू, सोलगाव, साखरकुंभे अशा गावांमध्ये उद्धव ठाकरे जात असून तेथील ग्रामस्थांच्या भावना ते जाणून घेत आहेत. यानंतर उद्धव ठाकरे यांची महाड येथे जाहीर सभा देखील होणार आहे. या सभेत उद्धव ठाकरे बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात आपली भूमिका देखील स्पष्ट करणार आहे.
मात्र, त्यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत असताना प्रकल्पाची माहिती हिम्मत असेल तर इथे येऊन द्या तो प्रकल्प ग्रामस्थांना समजावून सांगा आणि ग्रामस्थांनी होकार दिला तरच हा प्रकल्प करा असं आवाहन देखील सत्ताधाऱ्यांना केलं आहे. यासोबतच पोलिसांना बाजूला ठेवून येऊन दाखवा म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ओपन चॅलेंज दिला आहे.
डोके फोडून हा प्रकल्प होऊ शकत नाही आमचा येथील ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी जाहीर केला आहे. एकूणच उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्री असताना दिलेल्या पत्राच्या संदर्भातही माहिती देत शिवसेना कोकण वासियांच्या बरोबर असल्याचं म्हटलं आहे.
एकूणच उद्धव ठाकरे यांचा बारसू येथील रिफायनरीला विरोध कायम असून ग्रामस्थांच्या भूमिकेला सरकारचा पाठिंबा असल्याचे जाहीर करत कुठल्याही परिस्थिती हा प्रकल्प होऊ देणार नाही. येथील शेतकऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे नुकसान होऊ देणार नाही अन्यथा पेटवून टाकू म्हणत उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहे.