रत्नागिरी | मागील दोन वर्षे कुणालाच मुख्यमंत्री दिसले नाहीत. आता मेव्हणा पकडला गेला म्हणून तडफड आहे. इकडे मेव्हणा पकडला गेला आणि मुख्यमंत्री बाहेर आले, अशी खोचक टीका भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली आहे. मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने कोणत्याही जाहीर कार्यक्रमांमध्ये तसेच बैठका आणि अधिवेशनातही उपस्थित नव्हते. मात्र सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात (Budget session) ते उपस्थित झालेत. काल त्यांनी सभागृहात भाषणदेखील केलं. या भाषणाचीही निलेश राणे यांनी चांगलीच खिल्ली उडवली. मुख्यमंत्र्यांचं भाषण हे अत्यंत रटाळ आणि कुजलेलं होतं, अशी टीका त्यांनी केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांचा उद्या दापोली येथे दौरा आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोमय्यांच्या दौऱ्याला विरोध केला आहे. यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे पत्रकारांशी बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर प्रतिक्रिया देताना निलेश राणे म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांचा मेव्हणा पकडला गेल्याने ही तडफड आहे. इतके वर्ष मुख्यमंत्री दिसले नाही. मुख्यमंत्रीही असे मिळालेत की ज्यांना महाराष्ट्र कळला नाही. विधिमंडळ कळले नाही. दोन वर्ष मुख्यमंत्री दिसले नाहीत, मेव्हणा पकडला गेला म्हणून मुख्यमंत्री बाहेर आले.’
मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत काल भाषण केलं. त्यावरूनही निलेश राणे यांनी त्यांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, ‘ विधानसभेतील मुख्यमंत्र्याचे भाषण नव्हते ते सेना भवनातलं भाषण होतं. बाबासाहेबांच्या भाषणाची क्वालीटी मुख्यमंत्र्यामध्ये नाही. टोमणे मारणे म्हणजे मुख्यमंत्र्याचे भाषण नसते. मुख्यमंत्र्याचे भाषण म्हणजे रटाळ कुजलेलं भाषण होतं. विरोधीपक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांनी चिरफाड केली. त्यात ते निरुत्तर झालेत. मुख्यमंत्र्यांनी लोकं टिंगल उडवायला लागलेत. मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यासारखे बोलत नाही. ते दादरमध्ये असल्यासारखे बोलतात, अशी टीका त्यांनी केली.
केंद्रीय तपास यंत्रणांचा भाजप स्वार्थासाठी वापर करतेय, असा आरोप केला जातोय. यावर बोलताना निलेश राणे म्हणाले, ‘ चोरी चकारी केली तर ईडी मागे लागणारच. यांनी चोरी केली तर हुकुमशाही… केंद्राचा दबाव असं म्हटलं जातं. मग नारायण राणेंना आठवड्याला तीन नोटिसा येतात. खोट्या केसेस दाखल केल्या जातात. तक्रार नसताना केस हे महाराष्ट्रात पहिल्यांदा घडतंय. आपण काय करतो हे ठाकरे सरकारने पहावे, असा इशाराही निलेश राणे यांनी दिला.
दापोली येथील अनिल परब यांचे रिसॉर्ट अनधिकृत असून त्यावर कारवाई होत नाही, असा आरोप करत याची विचारणा करण्यासाठी किरीट सोमय्या उद्या 26 मार्च रोजी दापोली येथे येत आहेत. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने यास विरोध केला आहे. सोमय्यांना अडवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावर बोलताना निलेश राणे म्हणाले, ‘ सोमय्या प्रशासनाला जाब विचारायला येत आहेत. कुणाच्यात हिंमत असेल.. कोण आडवं येतं ते पहायचं आहे. तुम्ही जर याला राजकीय रंग देणार असाल आम्ही बुलडोजर घेवून जातोय. आम्ही प्रशासनाला विचारायला जातोय आम्हाला धमकी देणार असतील तर जशास तसे उत्तर देवू. दोन हात करायचे ठरवले असतील तर आमचे काय हात बांधलेले नाहीत, असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे.
इतर बातम्या-