रत्नागिरी स्थानकातील छताच्या PVC शीट कोसळल्या, प्रियांका गांधींनी व्यक्त केला संताप, कोकण रेल्वे म्हणालं “हा व्हिडीओ…”
महाराष्ट्रातील जनता लवकरच याचा हिशोब करेल, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले होते. यानंतर कोकण रेल्वेने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.

Ratnagiri Railway Station PVC Sheet Fall : गेल्या काही महिन्यांपासून कोकण रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून कोकण रेल्वे मार्गावरील अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट केला जात आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने हे काम हाती घेण्यात आले आहे. याला कोकण रेल्वे मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. पण आता रत्नागिरीत झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे स्थानकातील पीव्हीसी शीट खाली पडल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी याबद्दलचा एक व्हिडीओ ट्वीट केला होता. आता या व्हिडीओवर कोकण रेल्वेने स्पष्टीकरण दिले आहे.
कोकण रेल्वेने नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटरवरुन एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी रत्नागिरी स्टेशनची सद्यस्थिती दाखवली आहे. यात रत्नागिरी स्थानकातील सर्व गोष्टी व्यवस्थित असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यासोबतच त्यांनी याला कॅप्शन देताना काँग्रेसला प्रत्युत्तर दिले आहे.
सध्या सोशल मीडियावर रत्नागिरी स्थानकातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र तो व्हिडीओ नागरिकांची दिशाभूल करणार आहे. “रत्नागिरी स्थानकाची इमारत सुस्थितीत आहे. तसेच ट्रेनच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. व्हायरल होणारा व्हिडीओ हा महाराष्ट्रातील सार्वजनिक बांधकाम खात्याद्वारे विकसित होणाऱ्या आणि बांधकामाधीन असलेल्या पार्किंग क्षेत्राचा आहे”, असे कोकण रेल्वेने सांगितले आहे.
This is a misleading information.
The station building is intact and there is No Impact on Train Operations.
The video shown is of under construction parking area being developed by PWD , Maharashtra. @RailMinIndia https://t.co/Gwqsu9rIeT pic.twitter.com/7HilkmXBSz
— Konkan Railway (@KonkanRailway) October 7, 2024
नेमकं काय घडलं?
सर्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाचे काम सुरु आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाचेही काम यातंर्गत केले जात आहे. मात्र रविवारी रत्नागिरीत जोरदार पाऊस आणि सोसायट्याचा वारा सुटला होता. यावेळी रत्नागिरीत रेल्वे स्थानकात सुशोभीकरणासाठी लावलेल्या काही पीव्हीसीची शीट खाली पडल्या. तर काही शीट या लोंबकळत असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
यानंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी याबद्दलचा एक व्हिडीओ ट्वीट केला होता. महाराष्ट्रातील रत्नागिरी स्टेशनचे छत उद्घाटनापूर्वीच कोसळले. तर दुसरीकडे मुंबई-नाशिक महामार्ग अद्याप पूर्ण तयारही झालेला नाही, त्यात 500 हून अधिक खड्डे पडले आहेत. याआधी सिंधुदुर्गात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनानंतर काही महिन्यांतच कोसळला होता. मुंबईत 18 हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या अटल सेतूला जोडणाऱ्या रस्त्याला खड्डे पडले आहेत. महाराष्ट्रात खोके आणि धोके सरकारने जनतेला विकासाच्या नावाखाली फसवून मोठा भ्रष्टाचार केला आहे. महाराष्ट्रातील जनता लवकरच याचा हिशोब करेल, असे प्रियांका गांधी यांनी म्हटले होते. यानंतर कोकण रेल्वेने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले आहे.