चिपळूण : लोकसभा निवडणुकीसाठी वर्षभरापेक्षा कमी कालावधी उरला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे विनायक राऊत विद्यमान खासदार आहेत. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून विनायक राऊत, शिवसेना (शिंदे गटाकडून) किरण सामंत आणि भाजपाकडून निलेश राणे यांच्या नावाची चर्चा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गाच्या लोकसभा जागेसंबंधी मंत्री उदय सामंत यांनी सूचक विधान केलं आहे.
“किरण सामंत हे माझे सख्खे भाऊ आहेत. मात्र त्यांनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार आहे. पण ते निवडणुकीला उभे राहिले, तर त्यांना तीन ते साडेतीन हजार मतांनी निवडून आणू” असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे. ते शिवसेना शिंदे गटामध्ये आहेत.
तर महायुतीत तणाव वाढणार?
किरण सामंत यांच्या उमेदवारीवरून रत्नागिरीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा आहे. शिंदे गटाने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला, तर महायुतीमध्ये तणाव वाढू शकतो. कारण सिंधुदुर्गमध्ये अजूनही नारायण राणे यांच बऱ्यापैकी वजन आहे.
नारायण राणे यांचं वर्चस्व होतं
सिंधुदुर्गात आधी नारायण राणे यांचं वर्चस्व होतं. पण 2014 नंतर हा बालेकिल्ला ढासळला. 2014 मध्ये आधी नारायण राणे यांचे सुपूत्र निलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर विधानसभेला कुडाळमधून नारायण राणे यांचा पराभव झाला. लोकसभेला शिवसेनेचे विनायक राऊत आणि विधानसभेला शिवसेनेचे वैभव नाईक आमदार झाले. फक्त कणकवली विधानसभेची जागा नितेश राणे यांच्याकडे आहे. सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या रुपाने भाजपाकडे एक वजनदार नेता आहे. पण महायुतीच्या या जागेवरुन रस्सीखेच होऊ शकते.