आपका खत मिला, शुभकामना के साथ धन्यवाद, PMO चं अण्णांना एका ओळीचं पत्र
अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रानं अण्णांना फक्त एका ओळीचं पत्र पाठवलं आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नाही की काय असा प्रश्न आहे. चौथ्या दिवशी राळेगणसिद्धीच्या नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत, आंदोलन केलं. 1 ओळीचं पत्र अण्णांना पंतप्रधान कार्यालयाने 1 ओळीचं पत्र पाठवलं. ‘आपका 1 जनवरी का […]
अहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. महत्त्वाचं म्हणजे केंद्रानं अण्णांना फक्त एका ओळीचं पत्र पाठवलं आहे. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनाबाबत सरकार गंभीर नाही की काय असा प्रश्न आहे. चौथ्या दिवशी राळेगणसिद्धीच्या नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत, आंदोलन केलं.
1 ओळीचं पत्र
अण्णांना पंतप्रधान कार्यालयाने 1 ओळीचं पत्र पाठवलं. ‘आपका 1 जनवरी का खत मिला, शुभकामना के साथ धन्यवाद’ केवळ इतकाच उल्लेख या पत्रात आहे. पीएमओ कार्यालयाच्या एका ओळीच्या उत्तराने अण्णा नाराज झाले आहेत. मागण्यांकडे केंद्र सरकारचे पूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला.
गावकऱ्यांचं आंदोलन
दुसरीकडे चौथ्या दिवशीही सरकार आंदोलनाची दखल घेत नसल्याने, राळेगणसिद्धीच्या गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गावकऱ्यांनी आज जेलभरो आंदोलन केलं. गावातील काही तरुण थेट टॉवरवर चढले. ग्रामस्थ आज रस्त्यावर उतरले. पारनेर वाडेगव्हान हा रस्ता रोखून गावकऱ्यांनी आंदोलन केलं. मोठ्या संख्येने नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी आज राळेगणसिद्धीच्या आंदोलक गावकऱ्यांना ताब्यात घेतलं. महिलांसह वृद्धांचाही यामध्ये समावेश आहे. त्याआधी गावकऱ्यांनी काल थाळीनाद आंदोलन केलं होतं.
अण्णांचं वजन 3 किलोने घटलं
दरम्यान, आंदोलनाच्या चौथ्या दिवशी अण्णांचे वजन 3 किलो 400 ग्रॅमने घटले. नियमित आणि शासकीय रुग्णालयाच्या डॉक्टरांनी आज अण्णांची तपासणी केली. रक्तदाब स्थिर, मात्र जास्त न बोलण्याचा सल्ला डॉक्टरांनी अण्णांना दिला.
अण्णांचं आंदोलन
लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा हजारेंनी 30 जानेवारीपासून त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात उपोषणाला सुरुवात केली आहे. अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राळेगणसिद्धीचे गावकरीही धरणे आंदोलन करणार आहेत.
राज्य सरकारचं आवाहन
दरम्यान, आम्ही अण्णा हजारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण अण्णा चर्चेला तयार नव्हते. आम्ही अण्णा हजारे यांच्या 80% मागण्या मान्य केल्या आहेत. अण्णा यांनी वय आणि प्रकृती लक्षात घेता हे उपोषण करु नये, गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री अण्णा हजारे यांच्यासोबत बोलले होते. पुन्हा मी दोन दिवसांनी अण्णा हजारे यांना भेटायला जाणार आहे. या विषयावर 2 दिवसांत तोडगा निघेल, असा विश्वास जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला. तर अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, असं आवाहन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं.
अण्णांची मागणी काय आहे?
केंद्रात लोकपाल नियुक्तीसाठी अण्णा हजारे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आणि अण्णांनी त्यांचं गाव राळेगणसिद्धीतून या उपोषणाला बुधवारी 30 जानेवारीपासून सुरुवात केली. अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनानंतर 2013 साली तत्कालीन यूपीए सरकारने लोकपाल कायदा मंजूर केला. पण त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही. केंद्र सरकारकडून लोकपालच्या नियुक्तीसाठी पॅनलची नियुक्ती करण्यात आली आहे. या पॅनलकडून लोकपाल कुणाला नियुक्त करायचं त्याबाबत शिफारस करण्यात येईल आणि त्यानंतर पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, सरन्यायाधीश (किंवा सरन्यायाधीशांनी नियुक्त केलेले न्यायमूर्ती) आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेता यांच्या उच्चस्तरीय समितीकडून लोकपालची नियुक्ती केली जाईल.
लोकपाल नियुक्ती, लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित दीडपट भाव या मागण्यांसाठी अण्णा त्यांच्या राळेगणसिद्धी या गावात आंदोलन करत आहेत.
संबंधित बातम्या
वाचा: सत्ताधारी असो किंवा विरोधक, लोकपालला सगळेच का घाबरतात?