पालकमंत्र्यांकडून मिळाली अनपेक्षित भेट, व्यासपीठावर ओघळले आनंदाश्रू, नाट्य संमेलनात काय घडलं
छत्रपती शाहू महाराज यांना ज्या वेळेस एखादी कुस्ती आवडायची त्यावेळी महाराज स्वतःच्या डोक्यावरील फेटा काढून पैलवानाला भेट देत असत. कधी हातातील कडाही कडून देत असत. कडा देण्याइतका मी काही मोठा नाही. परंतु, मी शाहू महाराजांचा भक्त आहे.

सोलापूर | 28 जानेवारी 2024 : सोलापूरमध्ये शंभरावे अखिल भारतीय नाट्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे यंदाचे हे शतक महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे राज्यात 6 ठिकाणी नाट्य समेलन होत आहेत. सोलापुरमध्ये नाट्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा संमेलनाचे स्वागताध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हस्तांतर सोहळा पार पडला. याच सोहळ्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या एका कृतीतून उपस्थितांची मने जिंकली.
सोलापुरात आयोजित करण्यात आलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अखरेच्या दिवशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहिले. गेले दोन महिने या संमेलनासाठी अहोरात्र राबणारे संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंखे यांनी त्यांचे स्वागत केले. संमेलन यशस्वी करण्यामध्ये विजयकुमार साळुंखे यांचा मोठा वाटा होता. व्यासपीठावर आयोजनासंदर्भात सत्कार करण्यात येत होते.
पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी यावेळी विजयकुमार साळुंखे यांचा हात धरून त्यांना व्यासपीठावर नेले. आपल्या हातातील घड्याळ काढले आणि ते विजयकुमार साळुंखे यांना भेट म्हणून दिले. पालकमंत्र्यांनाकडून अनपेक्षितपणे मिळालेल्या या अनोख्या भेटवस्तूमुळे कार्यवाह विजयकुमार साळुंखे यांना व्यासपीठावरच आनंदाश्रू आले.
पालकमंत्री चंद्रकात पाटील यांनी यावेळी छत्रपती शाहू महाराज यांचा उल्लेख केला. छत्रपती शाहू महाराज यांना ज्या वेळेस एखादी कुस्ती आवडायची त्यावेळी महाराज स्वतःच्या डोक्यावरील फेटा काढून पैलवानाला भेट देत असत. कधी हातातील कडाही कडून देत असत. कडा देण्याइतका मी काही मोठा नाही. परंतु, मी शाहू महाराजांचा भक्त आहे. त्यामुळे मला एखादी कृती जर आवडली तर मी माझ्या हातातील घड्याळ संबंधिताला भेट देत असतो असे म्हणत च्नाद्र्कांत पाटील यांनी कार्यवाह विजयकुमार साळुंखे यांची गळाभेट घेतली.
दरम्यान, आपण आयुष्यभर केलेल्या कामाचं हे फलित आहे. हे संमेलन यशस्वी करण्यामध्ये अनेकांची मदत मिळाली. पालकमंत्री यांच्याकडून मिळलेली ही भेट माझी एकट्याची नाही तर गेले दोन महिने माझ्यासोबत राबणारे माझे सहकारी आणि हे संमेलन यशस्वी करण्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्यांच्यासाठी ही भेट आहे अशी प्रतिक्रिया विजयकुमार साळुंखे यांनी यावेळी दिली.