महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वारकऱ्यांपेक्षा मोठे नाहीत, पंढरपूरच्या पूजेवरून वारकऱ्यांची काय मागणी?
Pandharpur | बुलढाण्यात सध्या राज्यस्तरीय वारकरी परिषद सुरु आहे. या परिषदेत पंढरपुरात होणाऱ्या महत्त्वाच्या कार्यक्रमांवरून तसेच वारकऱ्यांच्या प्रश्नांवरून विचारमंथन सुरु आहे.
बुलढाणा | पंढरपूर (Pandharpur) येथील आषाढी एकादशी तसेच कार्तिकी एकादशी निमित्त होणाऱ्या महापूजेवरून वारकरी (Warkari) संप्रदायाने नवी मागणी केली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) हे वारकऱ्यांपेक्षा मोठे नाहीत, असं वक्तव्य करण्यात आलंय. दोन्ही एकादशीनिमित्त राज्यभरातून लाखो भाविक, वारकरी पंढरपूरमध्ये दाखल होतात. मात्र त्यांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी अनेक तास ताटकळत रहावे लागते. महापूजेसाठी मुख्यमंत्री, इतर मंत्री, अधिकारी यांना खूप वेळ लागतो. पण राज्यभरातून आलेल्या लाखो भाविकांना यावेळी बाहेर तिष्ठत रहावे लागते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पूजेचा वेळ मर्यादित असावा, अशी मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली आहे. बुलढाण्यात राज्यस्तरीय वारकरी परिषद नुकतीच पार पडली. यावेळी ही महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे.
वारकऱ्यांची नेमकी मागणी काय?
गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरला लाखो वारकरी येत असतात. मात्र त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी कुठलीही सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही. वारकऱ्यांसह इतर भाविकांना दोन-तीन दिवस दर्शनासाठी वाट पाहावी लागते. परंतु नेतेमंडळी आणि अधिकाऱ्यांना काही वेळात दर्शन होते, हे थांबलं पाहिजे. सोबतच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी पूजा ही अनेक तास चालते. त्या पूजेच्या वेळेला देखील मर्यादा असली पाहिजे. मुख्यमंत्री हा वारकऱ्यांपेक्षा मोठा नाही, असं मत विश्व वारकरी सेनेचे राज्य उपाध्यक्ष रामभाऊ महाराज झांबरे व्यक्त केलं आहे. बुलढाण्यात आयोजित राज्यस्तरीय वारकरी परिषदेत ते बोलत होते.
बागेश्वर बाबांना बंदी घाला
तर महाराष्ट्रात बागेश्वर बाबा यांच्या कार्यक्रमांना बंदी घालण्याची मागणी वारकरी संप्रदायाने केली आहे. संत तुकाराम आणि त्यांच्या पत्नीविषयी काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबा यांनी वादग्रस्त वकत्व्य केलं होतं. त्यावरून वारकरी संप्रदायाकडून जोरदार निषेध व्यक्त केला जातोय. बुलढाण्यातील परिषदेतही हाच सूर कायम राहिला.
नांदुरा येथे राज्यस्तरीय परिषद
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील संत दत्तूजी महाराज यांची पुण्यभूमी असलेल्या श्री क्षेत्र बरफगाव या ठिकाणी राज्यस्तरीय वारकरी परिषद ची काल पासून सुरुवात झाली आहे. वारकऱ्यांना विमा मिळावा,पंढरपूरला आषाढी कार्तिकीला जाणाऱ्या वारकऱ्यांना परतीच्या प्रवासा पर्यंत सुरक्षा मिळावी, आमच्या किर्तन प्रवचनच्या मधात कुणी येऊ नये असे महत्वाचे ठराव या राज्य स्तरीय वारकरी परिषदेने एकमुखाने पारित करण्यात आले आहेत.