मराठा की कुणबी? कुणाचा विरोध तर कुणाचा पाठिंबा, राणे – कदम यांच्या वक्तव्यावरून राज्यात आगडोंब
आम्ही 96 कुळी मराठा आहे. त्यामुळे कुणबी मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मान्य नाही असे वक्तव्य नारायण राणे आणि रामदास कदम यांनी केले. त्यांच्या याच विधानावरून मराठवाड्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे.
मुंबई | 22 ऑक्टोंबर 2023 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी राज्यसरकारला चाळीस दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत 24 ऑक्टोबरला संपत आहे. त्यापूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध केलाय. नारायणे राणे यांनी मु कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र घेणार नाही असे विधान केले. त्यापाठोपाठ रामदास कदम यांनीही जरांगे यांचा अभ्यास कच्चा आहे अशी टीका केलीय. कोकणात कुणबी आणि मराठा यांच्यात रोटी बेटी व्यवहार होत नाहीत. त्यामुळे कोकणातील कोणताही मराठा कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही असा दावा रामदास कदम यांनी केलाय. मात्र, या दोन्ही नेत्यांच्या विधानावरून राज्यात आगडोंब उसळलाय. कुणबी मराठा प्रमाणपत्र काही जणांना हवंय तर कुणी त्याला विरोध केलाय.
आम्ही 96 कुळी मराठा आहे. त्यामुळे कुणबी मराठा म्हणून आम्हाला आरक्षण मान्य नाही असे वक्तव्य नारायण राणे आणि रामदास कदम यांनी केले. त्यांच्या याच विधानावरून मराठवाड्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठवाड्यातील मराठा समाजदेखील 96 कुळी आहे. तरीही त्याला आरक्षणाची गरज आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे ठरवतील तोच आमचा निर्णय कायम राहील, असा पवित्रा मराठवाड्यातील मराठा समाज बांधवांनी घेतला आहे. आम्हाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्याही नेत्यांनी आम्हाला सल्ला देवू नये असा इशाराही त्यांनी दिलाय.
मराठे यांना स्वातंत्र आरक्षण हवे
दुसरीकडे, कोकणातील मराठी समाज बांधवानी जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. परंतु, कोकणामधील कुणबी हा मराठा नाही. त्यामुळे कुणबी मराठा प्रमाणपत्र घेणार नाही या रामदास कदम आणि नारायण राणे यांच्या दाव्यात तथ्य असल्याचे त्यांनी सांगितले. आम्हाला आरक्षण हवे मात्र ते कुणबीमधून नको. मराठे यांना स्वातंत्र आरक्षण हवे अशी मागणी कोकणातील मराठा समाज बांधवानी केलीय.
सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र मराठ्यांना देता येणार नाही – बबनराव तायवाडे
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्यास विरोध केलाय. कुठल्याही परिस्थितीत सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र मराठ्यांना देता येणार नाही ही आमची मागणी आहे. तसे लेखी आश्वासन सरकारने आम्हाला दिलंय. त्यामुळे जरांगे पाटलांची मागणी सरकार कशी पूर्ण करते याकडे आमचं लक्ष आहे. ज्या दिवशी सरकार आम्हाला दिलेले आश्वासन पाळणार नाही असे लक्षात येईल त्या दिवशी गावा खेड्यातून ओबीसी रस्त्यावर उतरेल आणि आपल्या संविधानिक अधिकाराचे रक्षण करेल, असा इशारा तायवाडे यांनी दिलाय.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे – सुजात आंबेडकर
मराठा समाजात दोन भाग आहेत. एका बाजूला श्रीमंत मराठा आहेत ते सरंजामी भूमिकेतून चालतात. संस्था उद्योग खिशात घालून 8 ते 9 कुटुंबाचे हित करतात आणि उर्वरित मराठा गरीब कुटुंबाला वापरून घेतात. पण, आता गरीब मराठा लोकांचे आंदोलन सुरु आहे. त्याला आमचा पाठिंबा आहे. नारायण राणे सारखे नेते वाकडे वक्तव्य करतात. हा इश्यू डायव्हर्ट करायचा आहे. कारण, त्यांचे सरकार प्रेशरखाली येत आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. मात्र, मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी दिली.
ज्यांना नको त्यानी घेऊ नका – अशोक चव्हाण
ज्यांना कुणबी मार्थ प्रमाणपत्र मान्य नाही त्यांनी कुणबी प्रमाणपत्र घ्या असा कुणाला आग्रह नाही. ज्यांना नको त्यांनी ये घेऊ नये असा सल्ला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी 96 कुळी मराठा नेत्यांना दिला. सरकारने आरक्षणाबाबत तातडीनं निर्णय घ्यावा. लोकांच्या भावनांचा उद्रेक वाढत आहे. लाखो लोकांची गर्दी पाहता लोकांच्या भावना तीव्र आहेत असं लक्षात येतं. सरकारकडून आरक्षणाबाबत काहीच स्पष्टपणे सांगितले जात नाही. त्यामुळे लोकांमध्ये रोष आणि नाराजी आहे असे अशोक चव्हाण म्हणालेत.