आरटीओच्या रडारवर रिक्षाचालक… लाखों रुपयांचा दंड गोळा करत केली मोठी कारवाई
नाशिक शहरात काही रिक्षा चालकांची मोठ्या प्रमाणात मुजोरी वाढली होती, हीच बाब आरटीओच्या निदर्शनास आल्यानंतर धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
नाशिक : बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई कधी करणार ? असा सवाल उपस्थित करणाऱ्या नाशिककरांना प्रादेशिक परिवहन विभागाने आपल्या कारवाईतून उत्तर दिले आहे. सोमवारपासून नाशिक शहरात प्रादेशिक परिवहन विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. यामध्ये रिक्षाचे कागदपत्रे, लायसन्स आणि चालकाच्या गणवेशासह रिक्षाची स्थिती अशा सर्वच बाबी तपासल्या जात आहे. नाशिकच्या विविध भागात प्रादेशिक परिवहन विभागाच्या विशेष पथकाकडून तपासणी केली जात आहे. मुदत संपलेल्या रिक्षा यामध्ये तर थेट जप्त केल्या जात आहे. याशिवाय ज्यादा प्रवासी, गणवेश परिधान न करणे, थकीत दंड अशा विविध बाबींची तपासणी केली जात असून अडीच लाखांचा दंड जप्त केला आहे. यामध्ये चाळीस रीक्षांची तपासणी करण्यात आली असून 17 मुदतबाह्य रिक्षा जप्त करण्यात आल्या आहे. शहरातील विविध भागात ही मोहीम कायम सुरू राहणार असल्याने मुदतबाह्य आणि बेशिस्त वाहन चालकांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.
नाशिक शहरात काही रिक्षा चालकांची मोठ्या प्रमाणात मुजोरी वाढली होती, हीच बाब आरटीओच्या निदर्शनास आल्यानंतर धडक कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.
नाशिकच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या विशेष पथकाने सोमवार पासून 40 रिक्षांची तपासणी केली असून त्यात 17 रिक्षा आयुर्मान संपलेल्या अवस्थेत प्रवासी वाहतुक करत होत्या.
अडीच लाख रुपयांचा दंड करत शहरात आरटीओने सुरू केलेल्या कारवाईमुळे प्रवाशांना एक मोठा दिलासा मिळणार आहे. ठिकठिकाणी आरटीओ पथक दिल्यास होणारी लूटही थांबणार आहे.
शहरात 1 डिसेंबर पासून मीटरप्रमाणे भाडे आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला असतांना त्यापूर्वीच रिक्षांची तपासणी करून आरटीओने रिक्षा चालकांना मोठा धक्का दिला आहे.
खरंतर शासनाच्या नियमानुसार ही कारवाई पुढील काळातही सुरू राहणार असल्याने मुदतबाह्य रिक्षाने होणारा धोकेदायक प्रवास टळणार आहे ही एक दिलासादायक बाब आहे.