तीन आमदार विरुद्ध एक अधिकारी रंगला सामना, पालकमंत्र्यांनी दिल्या चौकशीचे आदेश
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा अशा सूचना पालकमंत्री भुसे यांनी दिल्या आहेत.
नाशिक : नाशिकच्या जिल्हा परिषदेतील कार्यकारी अभियंता विरुद्ध दोन आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष यांच्यातील वाद चिघळला आहे. अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी याकरिता ही तिन्ही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, सत्ताधारी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे आणि इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरचे कॉँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. जिल्हा परिषदेतील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेन्द्र कंकरेज यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी हे तिन्हीही आमदार पत्रव्यवहार करत आहे. मात्र, या पत्रव्यहाराला हे अधिकारी जुमानत नसल्याने या आमदारांनी वारिष्ठ पातळीवर धाव घेत कारवाईसाठी कंबर कसली आहे. कंकरेज यांच्या दिरंगाईमुळे मतदार संघातील कामांना स्थगिती मिळाल्याचा त्यांच्यावर आरोप असून याबाबत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कंकरेज यांना कारणे दाखवा नोटिस बजावली होती. हे प्रकारणही मागे पडल्याने आमदारांनी थेट मुख्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्याकडे तक्रार केली असून पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी या प्रकरणाची चौकशी करून लवकरात लवकर अहवाल सादर करावा अशा सूचना पालकमंत्री भुसे यांनी दिल्या आहेत.
बांधकाम विभागाचे कार्यकारी अधिकारी सुरेन्द्र कंकरेज कामात दिरंगाई, कामे वाटपात होत असलेली अनियमिततेमुळे तत्कालीन सीईओ लीना बनसोड यांनी कोट्यवधी रुपयांच्या कामांना स्थगिती दिली होती.
बांधकाम विभागाच्या कामांना स्थगिती देऊन कारणे दाखवा नोटिस बजावली होती. सात दिवसाच्या आत खुलासा देण्याचे सांगितले होते, मात्र बनसोड यांची बदली झाल्याने कंकरेज यांनी याकडे कानाडोळा केला.
आमदार सुहास कांदे आणि हिरामण खोसकर यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी थेट विधानसभेत तक्रार करण्याची भूमिका घेतली असून अधिकाऱ्याला निलंबित करा अशी मागणी करण्याची भूमिका घेतली आहे.
पालकमंत्री दादा भुसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या अधिकाऱ्यांची नाशिकच्या लोकप्रतिनिधी यांनी केलेली तक्रार बघता अद्यापही कारवाई होत नसल्याने कंकरेज यांच्यावर कुणाचा वरदहस्त अशी चर्चा सुरू झाली आहे.
मतदार संघातील कंकरेज यांच्यामुळे कामे होऊ शकली नसून त्याचा फटका विकासावर बसल्याने आमदार आक्रमक झाले आहे, त्यामुळे तिन्ही आमदार विरुद्ध अधिकारी असा सामना सुरू असून चौकशीच्या अहवालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.