ठाणे : टिटवाळ्यात एका बिल्डरकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याने बिल्डर आणि त्याच्या नातेवाईकांच्या विरोधात टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर संबंधित बिल्डर आणि त्याच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे (Retired police officer was cheated by a builder in Titwala).
नेमकं प्रकरण काय?
टिटवाळा पोलीस स्टेशनमध्ये सिनिअर पीआय पदावर कार्यरत असलेले राजेंद्र नाईक हे 2012 साली टिटवाळा पोलीस ठाण्यातून सेवानिवृत्त झाले. या दरम्यान त्यांनी स्थानिक मंदाकिनी डेव्हलपर्स या बिल्डरकडून फ्लॅट घेण्यासाठी दीड लाख रुपये दिले. त्यानंतर 2016 साली नाईक यांनी पाच लाख रुपये रोख रक्कम दिली. त्यानंतर त्यांना हृदयाचा त्रास होऊ लागल्याने अनेक दिवस ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांचे सध्याचे वास्तव्य पुण्याला आहे (Retired police officer was cheated by a builder in Titwala).
राजेंद्र नाईक यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या घरासंबंधित व्यवहाराप्रकरणी बिल्डर अमित वाघांब्रे यांच्याकडे विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी वेळेवर पैसे दिले नाहीत म्हणून करार रद्द झाल्याचे सांगितले. तसंच ते घर दुसऱ्याला विकल्याचे बिल्डरने सांगितलं. इतकेच नाही तर नाईक यांनी सात लाख नव्हे तर केवळ दोन लाख रुपये दिले असल्याचा दावा बिल्डरने केला. त्यामुळे नाईक यांना बिल्डरविरोधात अखेर पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली.
पोलिसांचा तपास सुरु
नाईक यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला. या प्रकरणाचा तपास सध्या टिटवाळा पोलीस करीत आहेत. या प्रकरणी टिटवाळा पोलीस ठाण्यात बिल्डरासह त्याच्या नातेवाईकांच्या विरोधात फसवणुकीची गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करीत आहेत. या बिल्डरने अन्य किती जणांना फसविले? याचा तपास देखील पोलीस करत आहेत.