अवकाळीच्या नुकसानीची आकडेवारी समोर आल्यानंतर मदत देणार”; या मंत्र्यानं सरकारची बांधिलकी सांगितली
संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचाच फक्त एकमेकांवर विश्वास दिसतो आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्य कुणाचा विश्वास आहे का माहिती नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
शिर्डी: ऐन होळीचा सण राज्यभर साजरा होत असताना अवकाळी पावसाने नाशिक, अहमदनगर, सोलापूरसह सांगली जिल्ह्यातील काही भागाला जोरदार फटका बसला आहे. अवकाळी पावसाचा जोरदार फटका नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याला बसला आहे. गहू, द्राक्ष, हरभरा, मूग पिकांचे प्रचंड नुकसान होऊन द्राक्षबागा आता भूईसपाट झाल्या आहेत. त्यामुळे आता दुर्दैवाने अवकाळी पावसाचं शेतकऱ्यांवर संकट आले आहे अशी भावना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बोलताना व्यक्त केली.
अवकाळी पावसासंबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली जात आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी विखे पाटील यांनी सांगितले की, आतापर्यंत राज्य सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची होती.
मागच्यावेळी एनडीआरएफच्या निकषांच्या पलिकडे जाऊन मदत करण्यात आली आहे असंही त्यांनी सरकारची बाजू मांडताना सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार बांधील असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अवकाळी पावसाच्या नुकसानीची आकडेवारी समोर आल्यानंतर मदत करण्यात येईल असं अश्वासनही त्यांनी यावेळी दिले आहे.
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सरकार शेतकऱ्यांविषयी किती काळजीपूर्वक मदतीचे नियोजन करत आहे याचीही त्यांनी माहिती दिली.
यावेळी शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मदतीविषयी बोलताना सांगितले की, आतापर्यंत जवळपास साडेचार हजार कोटींचे वाटप झाले आहे. त्याचबरोबर अजूनही वाटप सुरू असून त्याचाही आढावा घेतला जात असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांना मदत जाहीर केली जाणारच आहे, मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मदतीची रक्कम वितरित करण्यास अधिक गती येणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.
तर राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या मदतीविषयी बोलताना त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरील हक्कभंगाच्या कारवाईविषयीही आपले मत नोंदविले आहे.
खासदार संजय राऊत यांना दिलेल्या नोटीस संदर्भात हक्कभंग समिती निर्णय घेणार आहे. त्याबाबतचा निर्णय हा समिती घेणार असल्याने आताच त्याविषयी बोलणे योग्य होणार नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचाच फक्त एकमेकांवर विश्वास दिसतो आहे. त्यामुळे त्यांच्यावर अन्य कुणाचा विश्वास आहे का माहिती नाही असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.
या दोन्ही नेत्यांवर टीका करताना,ते म्हणाले की,या दोन्ही नेत्यांकडून महाराष्ट्रातील जनतेचं मनोरंजन सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.
खासदार संजय राऊत यांनी बोलताना सांगितले होते की, उद्धव ठाकरे यांच्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांचा विश्वास असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विखे पाटील यांनी खिल्ली उडवली होती.