औरंगाबादच्या नामांतरावरुन रोहित पवारांचा शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला
एखाद्या शहराचं नाव बदलायचं असेल, तर त्या गावातील लोकांनाही विश्वासात घ्यावं, असं रोहित पवार म्हणाले (Rohit Pawar Shivsena Aurangabad )
सोलापूर : औरंगाबादच्या नामांतरावरुन राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला. औरंगाबादच्या नामांतराबाबत शिवसेनेची भूमिका आग्रही आणि विषय भावनिक आहे, मात्र रोजगाराचा प्रश्न महत्त्वाचा असल्याचं रोहित पवार म्हणाले. थकित वीज बिलाच्या कारवाईबाबतही रोहित पवारांनी ठाकरे सरकारला घरचा आहेर दिला. (Rohit Pawar taunts Shivsena indirectly over Aurangabad city rename)
“जनमत जाणून घ्या, सरकार ताकद देईल”
“औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. मी माझं व्यक्तिगत मत अनेक वेळा मांडलं आहे. एखाद्या शहराचं, गावाचं नाव बदलायचं असेल, तर त्या गावातील लोकांनाही विश्वासात घ्यावं. लोकशाही पद्धतीने किंवा अन्य माध्यमातून त्यांचं मत जाणून घेतलं, तर जो काय निकाल येईल, त्या निकालाला ताकद देण्याची जबाबदारी सरकारची असेल” असं रोहित पवार म्हणाले.
“तरुणांच्या रोजगाराकडे दुर्लक्ष नको”
“तरुणांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या रोजगाराचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणे गरजेचं आहे. महाविकास आघाडी ही कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर काम करते. त्यामुळे अनेक प्रश्नांवर काम करायचे आहे” असे रोहित पवार म्हणाले.
थकित वीज बिलावर ठाकरे सरकारला घरचा आहेर
रोहित पवारांनी राज्य सरकारलाही घरचा आहेर दिला. थकित वीज बिलाच्या कारवाईबाबत रोहित पवारांनी काही सवाल उपस्थित केले. वाढीव वीज बिलाची शहानिशा करण्याची गरज आहे. वाढीव वीज बिल कमी करण्याबाबत किंवा प्रत्यक्ष जेवढा वापर झाला, तेवढेच बिल द्यावे. यासाठी सरसकट धोरण करता येईल का, याचा अभ्यास राज्य सरकारने करावा, असंही रोहित पवारांनी सुचवलं. (Rohit Pawar taunts Shivsena indirectly over Aurangabad city rename)
ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार
कोरोना काळात विजेचा अतिरिक्त वापर झाला असेल पण तो तीन ते चारपट नक्कीच झाला नसेल. ग्राहकांना आलेल्या बिलाचा प्रत्यक्ष वापर कसा झाला याचा रिपोर्ट एमएसईबीने काढलाय का? तो रिपोर्ट काढण्याबाबत आदेश दिलेत का? असे सवाल विचारत, आदेश दिले असल्यास अहवाल काय आलाय, हे पाहावे लागेल, असेही रोहित पवार म्हणाले. सर्वसामान्य ग्राहकांचा आवाज ऊर्जामंत्र्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचंही रोहित पवारांनी सांगितलं.
हेही वाचा :
उद्या मलाही ईडीची नोटीस येऊ शकते: रोहित पवार
जेव्हा रोहित पवार हातगाडीवर स्वत: अंडा भुर्जी बनवतात…
(Rohit Pawar taunts Shivsena indirectly over Aurangabad city rename)