राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बोलावली महत्त्वाची बैठक, अजेंड्यावर विषय काय?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची अखिल भारतीय प्रतिनिधी सभा २१ ते २३ मार्च दरम्यान बंगळुरूमध्ये होणार आहे. हिंदू जागरण हा या बैठकीचा प्रमुख मुद्दा आहे. सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्यासह १४८० कार्यकर्ते उपस्थित राहतील.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून (RSS) अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या गुरुवारी २१ मार्चपासून ते शनिवारी २३ मार्चदरम्यान ही प्रतिनिधी सभा होणार आहे. कर्नाटकची राजधानी बंगळूरु येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे. या बैठकीच्या अजेंड्यावर हिंदू जागरण हा प्रमुख मुद्दा असणार आहे. या प्रतिनिधी सभेचा मुख्य कार्यक्रम शुक्रवारपासून सुरू होत असला तरी बुधवार (१९ मार्च) पासून प्रचार प्रमुखांच्या वतीने बैठकीसंदर्भात महत्त्वाची माहिती दिली जाणार आहे.
अखिल भारतीय प्रतिनिधी सभेच्या बैठकीपूर्वी उद्या बुधवारी १८ मार्च दुपारी १२.३० वाजता संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते या बैठकीच्या आयोजनाबद्दलची माहिती देतील. ही अखिल भारतीय प्रतिनिधी सभेसाठी आयोजित केलेली पत्रकार परिषद बंगळूरुतील चन्नेनहल्ली स्थित जनसेवा विद्या केंद्र या ठिकाणी होणार आहे. याच ठिकाणी अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे.
सहसरकार्यवाह आणि सरकार्यवाह देणार बैठकीची माहिती
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कर्नाटक यांच्याद्वारे जारी करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, या तीन दिवसीय बैठकीची सुरुवात शुक्रवारी २१ मार्च रोजी सकाळी ८.३० रोजी होणार आहे. तर बैठकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे २२ मार्च आणि २३ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे पत्रकारांना संबोधित करतील.
यापूर्वी, ५ मार्च रोजी संघाने जारी केलेल्या निवेदनात नमूद केले होते की, आगामी वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची आणि अभियानांची रुपरेषा आखली जाणार आहे. यासोबतच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्ष पूर्ण करण्यापूर्वी विविध कामांच्या प्रगतीचा आढावा घेणार आहे. येत्या विजयादशमीला आरएसएसला स्थापना होऊन १०० वर्षे पूर्ण होत आहेत.
हिंदू जागृती हा बैठकीचा अजेंडा
संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले की अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक २१ ते २३ मार्च दरम्यान बंगळुरुतील येथे जनसेवा विद्या केंद्राच्या परिसरात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत २०२४-२५ या वर्षासाठीच्या संघाच्या वार्षिक अहवालावर सखोल चर्चा केली जाईल. या बैठकीच्या अजेंड्यामध्ये ‘हिंदू जागृती’ या महत्त्वाच्या विषयाव्यतिरिक्त, देशातील सध्याच्या परिस्थितीचे विश्लेषण आणि भविष्यातील योजनांवरही विचारविनिमय केला जाणार आहे.”
या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठकीला सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह सर्व सह सरकार्यवाह आणि केंद्रीय कार्यकारिणीचे इतर प्रमुख सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत विविध प्रांत आणि क्षेत्र स्तरावरील सुमारे १४८० निवडक कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे.