“जितेंद्र आव्हाड बालिश, त्यांच्यासारखे राजकारणी…”, गुन्हा दाखल होताच रुपाली ठोंबरेंचा पलटवार
जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रुपाली ठोंबरेंनी शेअर केलेला फोटो खोटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता यावर रुपाली ठोंबरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
Jitendra Awhad VS Rupali Thombre : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेवरुन सध्या राजकारण तापले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काल बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला. आता यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर आरोप केले आहेत. जितेंद्र आव्हाड कुटुंबाला न्याय देण्यासाठी आले होते की आग लावण्यासाठी? सांगून टाका जितेंद्र भाऊ आव्हाड. उत्तर दया, असा सवाल रुपाली ठोंबरे यांनी विचारला होता. आता जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रुपाली ठोंबरेंनी शेअर केलेला फोटो खोटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आता यावर रुपाली ठोंबरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी रुपाली ठोंबरे यांच्याविरोधात बीड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रुपाली ठोंबरेंसह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता याबद्दल रुपाली ठोंबरेंनी भाष्य केले आहे. नुकतचं रुपाली ठोंबरेंनी टीव्ही ९ मराठीसोबत संवाद साधला. यावेळी रुपाली ठोंबरेंनी जितेंद्र आव्हाडांच्या चॅटचा तो स्क्रीनशॉट खरा असल्याचा दावा केला आहे.
जितेंद्र आव्हाड कसं काय सांगू शकतात की तो स्क्रीनशॉट त्यांचा आहे की नाही. कालच्या निषेध मोर्चातून राजकीय पोळ्या भाजण्याचं काम करण्यात आले. तो स्क्रीनशॉट खरा आहे. तो स्क्रीन शॉट जितेंद्र आव्हाडांचा आहे. कुठलाच आरोपी म्हणत नसतो हा स्क्रीनशॉट माझा आहे, असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या.
“जितेंद्र आव्हाडांचा बुरखा कायदेशीर फाडेल”
मी मनसेत असताना माझ्यावर 32 गुन्हे दाखल झाले आहे. हे सर्व गुन्हे लोकांना न्याय देताना झाले आहे. जितेंद्र आव्हाड यांची ही 33 वी केस आहे. त्यामुळे आपण बीडमध्ये भेटू. सोशल मीडिया काय कोर्ट नाहीये. तुम्हीच तो स्क्रीनशॉट घ्यायचा, त्याच्यावर फेक शिक्का मारायचा. राजकारणातल्या 32 केसेस होत्या आता 33 अच्छा हे मिलेंगे… मी बीडमध्ये जाईन आणि जितेंद्र आव्हाडांचा बुरखा कायदेशीर फाडेल, असेही रुपाली ठोंबरेंनी सांगितले.
“त्यांना कायद्याचं ज्ञान नाही”
“जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. अशा घाणेरडे केसेस तर आमच्यावर नाहीत. जितेंद्र आव्हाड सारखे राजकारणी महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करतात. माझ्यावर तुम्ही एक गुन्हा दाखल केलात, तुमच्यावर ही गुन्हे दाखल करतो. जितेंद्र आव्हाड यांनी शिवराज बांगरसोबत का कॉन्टॅक्ट केला, ते काढा. ते स्क्रीन शॉट खरे आहेत. स्वतःच्या अकाउंटला फेक टाकून, ते फेक म्हणाले, म्हणून फेक होत नाही. जितेंद्र आव्हाड बालिश आहेत. त्यांना कायद्याचं ज्ञान नाही. तो स्क्रीनशॉट खरा आहे. तुमच्यासारख्या राजकारण्यांनी सुधारलं पाहिजे, तुम्ही महाराष्ट्राचा अंत करताय”, असेही रुपाली ठोंबरेंनी म्हटले.