युक्रेनहून मराठवाड्यातले 14 विद्यार्थी परतले, आणखी 100 जणांची प्रतीक्षा, कुटुंबीयांचे प्राण कंठाशी
मराठवाड्यातील जे विद्यार्थी घरी पोहोचले आहेत, त्यांच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मात्र अजूनही जे विद्यार्थी अडकले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांची काळजी वाढतच आहे. रशिया युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत असल्याने कुटुंबीयांचे प्राण कंठाशी आले आहेत.
औरंगाबादः रशियाच्या हल्ल्यांमुळे (Russia-Ukraine war) खिळखिळ्या झालेल्या युक्रेनमधून (Ukraine) भारतीय नागरिकांना आपल्या देशात सुरक्षित आणण्याचे मोठे आव्हान सध्या भारत सरकारवर आहे. विशेष म्हणजे युक्रेनमध्ये अडकलेल्यांमध्ये एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांची (MBBS Students) संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. काही भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनमधून परत आणण्यात यश आले आहे. यापैकी मराठवाड्यातील 14 विद्यार्थी घरी परतले आहेत. यात नांदेडचे 6 , जालन्याचे 3, लातूर 2 आणि औरंगाबाद, परभणी, उस्मानाबादेतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. पोलंडच्या सीमेवर गर्दी वाढल्याने तेथून येणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, अशी माहिती प्रशासकीय यंत्रणांकडून देण्यात आली आहे.
आणखी 100 पेक्षा जास्त मराठवाड्याचे नागरिक
युक्रेनमध्ये असलेल्या औरंगाबादेतील दोन विद्यार्थ्यांनी रविवारी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अजय चौधरी यांनी संपर्क साधला. तेथे सध्या मराठवाड्यातील 100 पेक्षा जास्त नागरिक आहेत. यात 93 विद्यार्थी तर नोकरीसाठी गेलेल्या चौघांसह अन्य तिघांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. प्रशासन या सर्वांच्या सतत संपर्कात असून त्यांची माहिती मंत्रालयाच्या कंट्रोल रुमकडे देण्यात आली आहे. युक्रेनमधून अनेक विद्यार्थी पोलंड व रोमानियामार्गे भारतात परतण्यास सुरुवात झाली आहे.
युक्रेनमधून कोण कोण परतले?
मराठवाडा विभागातील 14 विद्यार्थी परतले असून त्यात औरंगाबादचा किरण भंडारी, उस्मानाबादची केतकी कोकाटे, जालन्यातील तेजस गणेश पंडित, संकेत उखर्डे, सुयोग धनवई आणि नांदेडमधील दीपक काकडे, संजीवनी वन्नीळीकर, प्रशांत नरोटे, तेजस गायकवाड, स्नेहा महाबळे, सत्यम गवळी, परभणीचा संजीवकुमार इंगळे, लातूरची ऋतुा देशमाने, वेदांत शिंदे यांचा समावेश आहे.
जालन्याचा एक भाऊ आला, दुसरा अडकला
जालन्यातील तेजस पंडित आणि त्याचा मोठा भाऊ शुभम पंडित हे एमबीबीएसच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेले होते. तेजस पंडित जालन्यात परतला असून शुभम हंगेरी बॉर्डरवर थांबला आहे. तेजस म्हणाला, आम्ही तीन दिवस घराच्या बाहेर निघाले नाहीत. शेवटी विद्यापीठाने बसने हंगेरी बॉर्डरवर आणून सोडले. संकेत उखर्डे म्हणाला, चार दिवस प्रचंड बॉम्बस्फोटांचे आवाज सुरु होते, त्यामुळे कधी एकदा भारतात परतू, असे वाटत होते. मराठवाड्यातील जे विद्यार्थी घरी पोहोचले आहेत, त्यांच्या पालकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. मात्र अजूनही जे विद्यार्थी अडकले आहेत, त्यांच्या कुटुंबीयांची काळजी वाढतच आहे. रशिया युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत असल्याने कुटुंबीयांचे प्राण कंठाशी आले आहेत.
इतर बातम्या-