“…तर कदाचित चेंगराचेंगरी झाली नसती”, संजय राऊतांनी मोदी सरकारला दाखवला आरसा
गाडी फलाटावर लागण्याच्या सुमारासच डब्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडेल, त्यातून एखादी दुर्घटना घडू शकेल आणि म्हणून आधीच काही बंदोबस्त करावा, हा विचार रेल्वे प्रशासनाच्या डोक्यात का शिरला नाही? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थितीत केला.
Saamana Editorial on Bandra Terminus Stampede : मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे टर्मिन्समध्ये चेंगराचेंगरी झाली आहे. या दुर्घटनेत 9 जण जखमी झाले. तर त्यातील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. वांद्रे टर्मिन्सवर झालेल्या चेंगराचेंगरीत जखमी झालेले बहुतांश प्रवाशी हे उत्तर भारतीय आहेत. हे सर्वजण छट पुजेसाठी उत्तरप्रदेशात जाण्यासाठी ट्रेन पकडत असताना काल पहाटे हा अपघात घडला. या घटनेनंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. वांद्रे टर्मिनसवर झालेली चेंगराचेंगरी मोदी सरकारच्या खोट्या स्वप्नांखालील अंधार आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून संजय राऊतांनी वांद्र्यातील चेंगराचेंगरीवर भाष्य केले आहे. फलाटावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचे नियमन आणि नियंत्रण ही रेल्वेचीच प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी रेल्वे पोलिसांशिवाय इतरही सुरक्षा यंत्रणा रेल्वेकडे आहे. वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरी झाली तेव्हा रेल्वेच्या या सर्व यंत्रणा पहाटेच्या साखरझोपेत होत्या का? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.
संजय राऊत काय म्हणाले?
वांद्रे रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीच्या घटनेने रेल्वे मंत्रालयाचा बेपर्वा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. संतापजनक आणि दुर्दैवाची गोष्ट इतकीच की, अशा अनेक दुर्घटनांनंतरही रेल्वे प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे व्हायला तयार नाही. सुखकर आणि सुरक्षित रेल्वे प्रवासाच्या गमजा रेल्वेमंत्री खूप मारतात. प्रत्यक्षात साधे रेल्वे गाडीत चढणेही आता सुरक्षित राहिलेले नाही. वांद्रे रेल्वे स्थानकातील चेंगराचेंगरीने हेच दाखवून दिले आहे, अशी टीका संजय राऊतांनी केली.
रविवारी पहाटे वांद्रे रेल्वे टर्मिनसवरील फलाट क्रमांक एकवर गोरखपूरला जाणाऱ्या अंत्योदय एक्प्रेसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. दिवाळी आणि छटपूजा यांचे निमित्त असल्याने प्रवाशांची संख्या मोठी असणार हे उघड होते. त्यात या गाडीचे सर्व डबे अनारक्षित होते. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच या गाडीत चढायला मिळावे म्हणून प्रवासी फलाटावर आले होते. एका माहितीनुसार सुमारे 2500 च्या आसपास प्रवासी फलाट क्रमांक एकवर होते. प्रश्न इतकाच की, या प्रचंड गर्दीची पूर्वकल्पना रेल्वे प्रशासनाला का आली नाही? ही पूर्ण गाडी अनारक्षित आहे म्हटल्यावर सामान्य, गरीब प्रवासी गर्दी करतील. गाडी फलाटावर लागण्याच्या सुमारासच डब्यांमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडेल, त्यातून एखादी दुर्घटना घडू शकेल आणि म्हणून आधीच काही बंदोबस्त करावा, हा विचार रेल्वे प्रशासनाच्या डोक्यात का शिरला नाही? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थितीत केला.
आता ही मंडळी चेंगराचेंगरीचे खापर प्रवाशांच्याच माथी फोडत आहेत. म्हणे, गाडी प्लॅटफॉर्मवर थांबण्यापूर्वीच प्रवाशांनी डब्यांमध्ये चढण्याचा प्रयत्न केला आणि त्या गोंधळातून चेंगराचेंगरी झाली. मुळात प्रश्न रेल्वेने घेण्याच्या पूर्वखबरदारीचा आहे. फलाटावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचे नियमन आणि नियंत्रण ही रेल्वेचीच प्राथमिक जबाबदारी आहे. त्यासाठी रेल्वे पोलिसांशिवाय इतरही सुरक्षा यंत्रणा रेल्वेकडे आहे. वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरी झाली तेव्हा रेल्वेच्या या सर्व यंत्रणा पहाटेच्या साखरझोपेत होत्या का? अनारक्षित गाडीची सोय करून सामान्य जनतेची आपण ‘विशेष सेवा’ केली असे ढोल रेल्वे प्रशासन पिटते खरे, परंतु या गरीब प्रवाशांच्या प्र्राणांचे मोल रेल्वेला नाही. प्रवाशांसाठी ट्रेनची व्यवस्था हे रेल्वेचे प्राथमिक कर्तव्य आहेच. मात्र त्या गाडीतून होणारा प्रवास निदान सुरक्षित व्हावा ही रेल्वेची प्राथमिक जबाबदारी नाही का? रविवारी वांद्रे टर्मिनस येथे रेल्वेने कर्तव्याचा फुगा तर फुगवला, परंतु त्यात जबाबदारीची हवाच भरली नाही. त्याची किंमत निरपराध प्रवाशांना चुकवावी लागली. प्रत्येक रेल्वे दुर्घटनेत यापेक्षा वेगळे काय घडते? असे अनेक प्रश्नही संजय राऊतांनी सरकारला विचारले आहेत.
प्रवास मेल-एक्सप्रेसचा असो की मुंबईतील उपनगरी रेल्वे सेवेचा, ना प्रवास सुरक्षित राहिलाय ना प्रवाशांचे जीव. यातनांचे हलाहल पीतच सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वेचा प्रवास करावा लागत आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यावर सुखद आणि सुरक्षित रेल्वे प्रवासाचे, रेल्वेच्या विकासाचे रंगीबेरंगी फुगे हवेत सोडण्यात आले. दोन रेल्वेची समोरासमोर टक्कर होणार नाही यासाठीच्या खास यंत्रणेचाही गवगवा केला गेला, परंतु याच सरकारच्या काळात देशात सुमारे 28 मोठे रेल्वे अपघात घडले. त्यात शेकडो बळी गेले, हजारो जखमी झाले. पुणे स्टेशनवर 2022 मध्ये दानपूर एक्प्रेसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांची चंगराचेंगरी झाली होती. गेल्या वर्षी सुरत रेल्वे स्थानकावर ताप्ती गंगा एक्प्रेसबाबत अशीच दुर्घटना घडली होती. या दोन्ही घटना दिवाळी, छटपूजेच्या पार्श्वभूमीवरच घडल्या होत्या. आता रविवारी वांद्रे टर्मिनसवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये दिवाळी आणि छटपूजेला जाणारे प्रवासीच सापडले. आधीच्या दोन दुर्घटनांपासून रेल्वेने धडा घेतला असता आणि वांद्रे रेल्वे स्थानकात पुरेशी खबरदारी घेतली असती, तर कदाचित चेंगराचेंगरी झाली नसती. मोदी आणि त्यांचे रेल्वेमंत्री बुलेट ट्रेन, हायस्पीड ट्रेन, वंदे भारतची नवीन मॉडेल्स अशा स्वप्नांचे फुगे हवेत सोडण्यात दंग आहेत. मात्र त्यांच्या या स्वप्नांच्या दुनियेत देशातील सामान्य रेल्वे प्रवाशांच्या जिवाला ना किंमत आहे ना मोल. रविवारी वांद्रे टर्मिनसवर झालेली चेंगराचेंगरी मोदी सरकारच्या खोट्या स्वप्नांखालील अंधार आहे!, असे संजय राऊत म्हणाले.