Sanjay Raut : आयोगाने निष्पक्ष निवडणुका घ्याव्यात – संजय राऊत
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुका निष्पक्षपणे घ्याव्यात. कोणत्याही दबावाखाली निवडणुका घेऊ नयेत.सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांना अकारण छळू नये, त्रास देऊ नये.
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या निवडणुका निष्पक्षपणे घ्याव्यात. कोणत्याही दबावाखाली निवडणुका घेऊ नयेत.सत्ताधाऱ्यांच्या विरोधकांना अकारण छळू नये, त्रास देऊ नये. निवडणुकीत पैशाचा आणि यंत्रणेचा जो दुरूपयोग केला जातो, तो रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने जागरूक रहायला हवं ही आमची माफक अपेक्षा आहे. निवडणूक आयोग काही दिवसांतच निवडणुकीची तारीख घोषित करेल आणि आचारसंहिता लागेल हे लक्षात घेऊन राज्यातील सत्ताधारी पक्षांपैकी काहींनी आपापल्या उमेदवाराकडे काल रात्रीपर्यंत पैशांचं वाटप केलं आहे. प्रत्येक मतदारसंघात उमेदवाराकडे साधारण 10 ते 15 कोटी रुपये पोहोचले आहेत, असा दावा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
आज निवडणुकीची घोषणा होईल, आचारसंहिता लागेल याची पक्की खबर सत्ताधाऱ्यांना आहे, त्यामुळे पहिला हप्ता म्हणून पैशाचं वाटप करण्यात आलं आहे, असा आरोप राऊत यांनी केला. ही माहिती मी निवडणूक आयोगाला देत आहे, त्याचं काय करायचं हा त्यांचा प्रश्न आहे. किंबहुना हे सर्व पैशांचं वाटप झाल्यावरच निवडणुकांची घोषणा होत्ये का, अशी शंकाही राऊत यांनी व्यक्त केली.
किती टप्प्यात निवडणुका होतील ?
सध्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोकळेच आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांचं परदेशात वगैरे फिरून झालं आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला. त्यामुळे महाराष्ट्रात एक टप्प्यात निवडणुका व्हायला हरकत नाही, असं ते म्हणाले.
एका बाजूला देवेंद्र फडणवीस घर घर संविधान, अशा गर्जना करत आहेत, जाहिराती करत आहेत , उपक्रम राबवत आहेत. पण तुमचं राज्यातलं प्रत्येक कृत्य हे संविधानाच्या विरोधातलं आहे. सात आमदारांची पाठवलेली यादी ही पूर्णपणे संविधानाच्या विरुद्ध आहे, राज्यपाल घटनाबाह्य काम करत आहेत, अशी टीकाही राऊत यांनी केली. उद्धव ठाकरेंनी पाठवलेल्या यादीवरील निकाल कोर्टात प्रलंबित असताना हा निकाल देणं चुकीचं असल्याचं संजय राऊत म्हणाले.
राज्य सरकारकडून राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आजच महायुतीच्या ७ आमदारांचा शपथविधी होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर राऊत बोलत होते.