“…तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही”, शरद पवारांवर आरोप करणाऱ्या हसन मुश्रीफांना कोणी सुनावलं?
हसन मुश्रीफ यांनी ६ वेळा अल्पसंख्यांक असा उच्चार केला, पण माझ्यामुळे मी आणखी ४ वेळा उच्चार करण्याची संधी त्यांना देत नाही", असेही ते म्हणाले.
Samarjit Ghatge On Hasan Mushrif : “जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी आले, त्यांनी सभा घेतली. काल पवार साहेबांनी सभा घेतली, मला समजत नाही की ते माझ्यासारख्या अल्पसंख्यांक कार्यकर्त्यांच्या मागे का लागले आहेत?” असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांनी उपस्थित केला. आता यावर शरद पवार गटाचे नेते समरजित घाटगे यांनी हसन मुश्रीफांना खडे बोल सुनावले आहेत. तुम्ही शरद पवारांवर जातीयवादचा आरोप केला आहे, याबद्दल महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही, असे समरजित घाटगेंनी म्हटले
समरजित घाटगे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफांनी शरद पवारांवर केलेल्या आरोपांवर भाष्य केले. “मी हसन मुश्रीफ यांचा कायमच आदराने उल्लेख करतो. ज्या व्यक्तीने तुम्हाला ही सर्व पदं दिली, तेव्हा अल्पसंख्यांक असा विषय नव्हता का?” असा प्रश्न समरजित घाटगे यांनी उपस्थित केला.
“त्यांनी शरद पवारांवर जातीवादाचा आरोप केला, मी याचा निषेध करतो”
“हसन मुश्रीफांनी मी एक अल्पसंख्याक आहे, असे म्हटल्याचा मला प्रचंड राग आहे. मला याचा प्रचंड संताप आहे. मला याची खंत वाटते. या देशाचे नेते शरद पवार यांचा राजकारणाचा अनुभव खूप दांडगा आहे. याआधीही कोणत्याही पक्षाच्या नेत्याने असं बोलायची हिंमत केलेली नाही, हे धाडस हसन मुश्रीफ यांनी केलं आहे. हसन मुश्रीफांनी शरद पवारांवर जातीवादाचा आरोप केला आहे. मी या गोष्टीचा पूर्ण निषेध करतो”, असे समरजित घाटगे म्हणाले.
“तुम्ही हे घोर पाप करत आहात”
मी हसन मुश्रीफ यांचा कायमच आदराने उल्लेख करतो. ज्या व्यक्तीने तुम्हाला ही सर्व पदं दिली, तेव्हा अल्पसंख्यांक असा विषय नव्हता का? राजकारणात आपण विविध पक्षांमध्ये आहोत, पण जी व्यक्ती तुमच्या वडिलांच्या वयाची आहे, त्यामुळे आता या वयात तुम्ही त्यांच्यावर असे आरोप कसे काय करु शकता, तुम्ही हे घोर पाप करत आहात. तुम्ही शरद पवारांवर जातीयवादचा आरोप केला आहे, याबद्दल महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही, असे समरजित घाटगेंनी म्हटले.
“तुम्ही जाहीर माफी मागा”
“तुम्ही मला वाटेल ते बोला, पण शरद पवारांवर तुम्ही जातीयवादाचा जो आरोप केला आहे, त्याबद्दल तुम्ही जाहीर माफी मागा. हसन मुश्रीफांनी आज शरद पवारांना थेट टार्गेट केलं. त्यांनी सभा घेतली होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येकाला हा अधिकार दिला आहे. कागल ही तुम्ही खासगी मालमत्ता नाही. गोबी चौकात येऊन सभा घेण्याचे धाडसं कसे करु शकतात, त्यांनी सभा घेतली आणि त्यांचे विचार मांडले. पण तुम्ही पवारांना थेट टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहात, याचा मी निषेध करतो”, अशा शब्दात समरजित घाटगेंनी हसन मुश्रीफांना सुनावले.
“आताही तुम्ही जातीचं कार्ड वापरताय”
“काहीही झालं की ते जातीचं कार्ड काढतात. ईडीने छापेमारी केली, तेव्हाही त्यांनी अल्पसंख्याक असल्याचे म्हटलं होतं. तेव्हाही तुम्ही जातींच कार्ड वापरलं होतं, आताही तुम्ही जातीचं कार्ड वापरताय, पण शरद पवारांवर जर तुम्ही आरोप करत असाल तर तुम्ही चुकीचे आहात. हसन मुश्रीफ यांनी ६ वेळा अल्पसंख्यांक असा उच्चार केला, पण माझ्यामुळे मी आणखी ४ वेळा उच्चार करण्याची संधी त्यांना देत नाही”, असेही समरजित घाटगे यांनी म्हटलं.