‘तो कुत्रा मी दत्तक घेणार’, भिडेंना कुत्रा चावल्यानंतर वकिलाने केली घोषणा!
सांगलीत एका धारकऱ्याच्या इथे गेलेले असताना संभाजी भिडे यांना एका कुत्र्याने चावा घेतला आहे. सध्या त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Sambhaji Bhide : सांगलीत एका धारकऱ्याच्या इथे गेलेले असताना संभाजी भिडे यांना एका कुत्र्याने चावा घेतला आहे. सध्या त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या त्यांची प्रकृती आहे. दरम्यान, भिडे यांना कुत्रा चावल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, तो भिडे यांना का चावला याची एसआयटी चौकशी करायला हवी, अशी खोचक टिप्पणी वडेट्ट्वीवार यांनी केली. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील अॅड. जय गायकवाड यांनी तर मोठी घोषणा केली आहे. भिडे यांना जो कुत्रा चावला आहे, त्याला मी दत्तक घेणार आहे, असं गायकवाड यांनी म्हटलंय.
मी कुत्र्याला दत्तक घेणार..
संभाजी भिडे यांना सोमवारी सांगलीमध्ये एक कुत्री (श्वान) चावला होता. त्यानंतर संभाजी भिडे यांनी शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेतले होते. मात्र उल्हासनगरमधील अॅड. जय गायकवाड यांनी एक मोठी घोषणा केली आहे. संभाजी भिडे यांना जो कुत्रा चावला आहे, त्याला मी दत्तक घेणार आहे. तसंच त्या कुत्र्याची संपूर्ण काळजी आम्ही स्वतः घेणार असं जय गायकवाड म्हणाले आहेत. तेसच नागरिकांना हा कुत्रा आढळल्यास त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहनही त्यांनी केलेय.
विशेष म्हणजे जो नागरिक या कुत्र्याची माहिती देईल त्याचा स्वराज्य संघटनेकडून मोठा सत्कार देखील आम्ही करू अशी माहिती अॅड. जय गायकवाड यांनी दिली आहे.
संभाजी भिडेंना कुत्रा कधी चावला?
मिळालेल्या माहितीनुसार संभाजी भिडे यांना सोमवारी एका कुत्रीने चावा घेतला. ते सांगली शहरातील माळी गल्लीत एका धारकऱ्याच्या घरी गेले होते. या धारकऱ्याकडून भिडे यांना जेवणाचे आमंत्रण होते. मात्र परतताना त्यांच्यावर एका कुत्रीने हल्ला केला आणि पायाचा चावा घेतला. या कुत्रीला एकूण चार पिलं आहेत. त्यामुळे माझ्यावर हल्ला होत आहे, असा समज करून स्वसंरक्षणार्थ या कुत्रीने भिडे यांच्या पायाचा चावा घेतला. ही घटना घडल्यानंतर भिडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती चांगली आहे.
भिडेंना कुत्रा चावताच पालिका अॅक्शन मोडवर
दरम्यान, भिडे यांना कुत्रा चावल्यानंतर सांगलीची महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. पालिकेकडून शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंत अनेक कुत्र्यांना पालिकेने पकडले आहे.