मराठवाड्याच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटात भूकंप? चंद्रकांत खैरे मला नेहमी डावलतात, या नेत्याने व्यक्त केली खदखद
Chandrakant Khaire Ambadas Danve | शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगर जिल्हा ओळखल्या जातो. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर येथे मोठ्या घडामोडी घडल्या. आता या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरे गटात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. या नेत्याने लोकसभेसाठी आग्रही भूमिका घेत दंड थोपाटले आहेत.
छत्रपती संभाजीनगर | 16 March 2024 : शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटातील धुसफूस पण चव्हाट्यावर आली. शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर ठाकरे गटाचे अंबादास दानवे हे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते झाले. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच लोकसभेची जोरदार तयारी करत प्रचाराचा नारळही फोडला. त्यावरुन आता अंबादास दानवे यांनी त्यांची जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रकांत खैरे हे आपल्याला सातत्याने डावलत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही, तोपर्यंत लोकसभेसाठी आपण आग्रही असल्याचे सांगत त्यांनी शड्डू ठोकले. या नवीन वादामुळे आता ठाकरे गटासमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. आपण शिंदे गटात जाणार नसल्याचे दानवे यांनी स्पष्ट केले आहे. पण शेवटी राजकारणात जर-तरला जागा असतेच असे म्हणतात, नाही का?
खैरेंसाठी नाही ठाकरेंसाठी काम करतो
अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यातील वाद यापूर्वी पण उफाळून आले होते. आता खैरे यांनी लोकसभा प्रचारासाठी कार्यालय सुरु करण्याचा श्रीगणेशा केला. त्यानंतर वाद उफाळून आला. उमेदवार घोषीत करण्यापूर्वीच खैरे यांनी प्रचाराला जणू सुरुवात केल्याने दानवे नाराज झाले आहेत. त्यांना कार्यालयाच्या भूमिपुजनाला पण बोलविण्यात आले नाही. याविषयीची तक्रार त्यांनी पक्ष प्रमुखांकडे केल्याची माहिती त्यांनी दिली. आपण खैरेंसाठी नाही तर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी काम करतो, असा टोला ही त्यांनी हाणला. लोकसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांचा पक्ष मांडला.
खैरे मला डावलतात
यावेळी अंबादास दानवे यांनी मनातील खदखद व्यक्त केली. खैरे मला सातत्याने डावलतात, असा आरोप त्यांनी खैरे यांच्यावर केला. मी संघटनेच्या विचारावर काम करतो. मी ठाकरे यांच्या नेतृत्वात काम करतो. त्यामुळे मला लोकसभेची उमेदवारी मिळावी असा हट्ट करणे, आग्रह धरणे यात गैर काय असा सवाल त्यांनी केला.
या हवेतील गप्पा
मला हट्ट करण्याचा अधिकार आहे. पण याचा अर्थ मी इकडे-तिकडे जाईल असा होत नाही. मी गेल्या दहा वर्षांपासून उमेदवारी मागत आहे. ही बाब काही लपून राहिलेली नाही. मी गेल्या दोन टर्म लोकसभेसाठी आग्रही आहे. दोन्ही वेळा उमेदवारी मिळालेली नसली तरी मी पक्षाचे काम केले आहे. त्यामुळे मी पक्ष सोडून जाणार या हवेतील गोष्टी आहेत. त्याला काही तथ्य नाही. मी कोणत्याही गटात जाणार नाही. जोपर्यंत लोकसभेचा उमेदवार जाहीर होत नाही, तोपर्यंत मी लोकसभेची उमेदवारी मिळण्याच्या स्पर्धेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.