चंद्रकांत खैरे वसुली बहाद्दर, किराणा दुकानही लुटले; संदीपान भुमरे यांचा सनसनाटी आरोप
आमदार अपात्रेबाबतही संदीपान भुमरे यांनी भाष्य केलं. आमदार अपात्रतेसंबंधी विधानसभा अध्यक्ष जो काही क्रांतिकारक निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, असंही संदीपान भुमरे यांनी स्पष्ट केलं.
औरंगाबाद : शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे आणि ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे. खैरे आणि भुमरे यांनी एकमेकांवर प्रचंड तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. भुमरे यांनी तर चंद्रकांत खैरे हे वसुली एजंट असल्याचं म्हटलं आहे. खैरे प्रत्येक कामात वसुली करतात. इतकच नाही तर त्यांनी किराणा दुकानदारांनाही सोडलं नाही, असा सनसनाटी आरोप संदीपान भुमरे यांनी केला आहे. त्यामुळे आता भुमरे यांच्या या आरोपांना खैरे काय उत्तर देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मीडियाशी संवाद साधताना भुमरे यांनी हा आरोप केला आहे.
चंद्रकांत खैरे यांचा काय व्यवसाय आहे? चार वेळा खासदार झाले. गाड्या घेऊन फिरतात. यांचा काय व्यवसाय आहे? यांना कुणी विचारलं पाहिजे, याची शेती आहे का? माझी तरी शेती आहे. यांचा मुलगा टक्केवारी मागतो त्याची कॉल रेकॉर्डिंग समोर आली आहे. चंद्रकांत खैरेंनी आजपर्यंत अनेक कार्यकर्त्यांना मातीत घालायचे काम केले म्हणून आज ही परिस्थिती आली. त्यामुळेच त्यांच्या कालच्या कार्यक्रमात रिकाम्या खुर्च्या दिसत होत्या, अशी टीका संदीपान भुमरे यांनी केली.
खैरे मागे मागे फिरतील
खैरे याचा एकच व्यवसाय लोकांना लुबाडायचे आणि टक्केवारी घ्यायचीय एकनाथ शिंदे साहेबांकडून 7 कोटीचा निधी आणला आणि तो पण विकला. खासदारकीला निवडून यायच्या आधीच त्यांनी ठेकेदारांकडून टक्केवारी घेतली. खैरेंनाच टक्केवारीची सवय आहे. आजपर्यंत चंद्रकांत खैरे फक्त टक्केवारीवर जगलेत. चंद्रकांत खैरेंनी आम्हाला शिकवू नये. आम्ही चोऱ्या करीत नाही. शासन मान्य व्यवसाय करतो. आणि खैरे आम्हाला टक्केवारीची भाषा करतात. हा कामे विकतो, असं सांगतानाच खैरेंना वेळेवर दाखवून देऊ. एक दिवस खैरे आमच्या मागे मागे फिरतील, असा दावाही त्यांनी केला.
एमआयडीसीही धुवून काढली
चंद्रकांत खैरे पक्षासाठी आमच्याकडून पैसे घ्यायचे आणि बॅनर त्यांचे लावायचे. खैरे हा वसुली बहाद्दर माणूस आहे. सभेला 25 लाख लागले तर हे कोटी दोन कोटी जमवत होते. खैरेंनी किराणा दुकाने सुद्धा लुटली आहेत. एमआयडीसी धुवून काढली आहे.माझ्याकडे ऑफिसला हजारो लोक राहतात आणि त्यांच्याकडे लोक धरून आणावे लागतात, असंही ते म्हणाले.
डोनेशन द्यावं लागतं
खैरेंनी मला तिकीट दिले नाही, मला किशनचंद तनवाणी, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाठ आणि दिवाकर रावते यांनी मदत केली. चंद्रकांत खैरे यांनी तर मला तिकीट मिळणार नाही. परत जा असं सांगितलं होतं. खैरेला तिकीट मागायचं म्हणजे डोनेशन द्यायला लागतं, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
स्वीकृत पदे घेत नाही
पैठण बाजार समितीत मला पैसा वाटायची गरज नाही. पैठण बाजार समिती पहिल्यापासून माझ्या ताब्यात आहे. खैरेच डोकं खराब झालेलं आहे त्यामुळे तो असे आरोप करतो. माझा भाऊ पहिल्या पासून सभापती आहे. आम्ही स्वीकृत पदे घेत नाही. जनतेततून निवडून येतो. खैरेने स्वतःच्या पुतण्याला स्वीकृत सदस्य केलं होतं, पोरगा नगरसेवक केला, असा आरोप त्यांनी केला.
म्हणून खुर्च्या रिकाम्या होत्या
यावेळी त्यांनी कालच्या ठाकरे गटाच्या मेळाव्यावरही भाष्य केलं. शिवसेनेचा मेळावा हा इतिहासातील सर्वात फेल मेळावा होता. संजय राऊत येऊन सुद्धा लोक आले नाहीत. त्यामुळे हा फेक कार्यक्रम होता हे दिसून आलं. ठाकरे गटावर कोणीही विश्वास ठेवायला तयार नाही. त्यामुळे मेळाव्यात खुर्च्या रिकाम्या राहिल्या, अशी टीका त्यांनी केली.
आमचा बाप काढू नका
आमचा बाप बाळासाहेब आहेत. बाळासाहेबांमुळे आम्ही घडलेलो आहे. संजय राऊत नव्हता तेव्हा. संजय राऊत ने आम्हाला शिकवू नये, तुम्ही आम्हाला बोलता मग उद्धव साहेब सोनिया गांधींना भेटायला का गेले होते? त्यांचा बाप कोण आहे? त्यांची आई कोण आहे.? शरद पावरला भेटायला जातात मग काय शरद पवार त्यांचा बाप आहे का? आमचे बाप काढू नका, असा इशारा त्यांनी दिला.