जयंत पाटील शिंदे सरकारमध्ये येणार होते, म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला; शिंदे गटातील बड्या नेत्याचा दावा
Shivsena Eknath Shinde Group MLA on NCP Leader Jayant Patil : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील शरिराने शरद पवारांसोबत पण मनाने आमच्याच सोबत आहेत. शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही निशाणा. हा दावा नेमका कुणी केलाय? वाचा सविस्तर...
कुणाल जायकर, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, छत्रपती संभाजीनगर | 31 डिसेंबर 2023 : शिंदे सरकार अस्तित्वात आलं तेव्हापासून मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मध्यंतरी अजित पवार गट महायुतीत सहभागी झाला. तेव्हा राष्ट्रवादीच्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र यात शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांचा समावेश नव्हता. शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अद्यापही रखलेला आहे. हा मंत्रिमंडळ विस्तार रखडण्यामागे असणाऱ्या विविध कारणांची राजकीय वर्तुळात चर्चा झाली. यावर आता शिंदे गटातील नेत्याने मोठं विधान केलं आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिरंगाईवर भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिंदे सरकारमध्ये येणार होते, म्हणून मंत्रिमंडळ विस्तार रखडला, असं संजय शिरसाट म्हणालेत.
“जयंत पाटलांमुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडला”
मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. कारण जयंत पाटील अजित पवार सोबत येणार होते. हा प्रस्ताव त्यांनी पुण्यात दिला होता. जयंत पाटीलच याबाबत शरद पवारसाहेबांना सांगणार होते. जयंत पाटील शरीराने तिकडे आहेत मनाने इकडे आहेत. जयंत पाटील आता आले नाहीत. मात्र ते आमच्यासोबत येतील. मात्र त्यांच्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला होता. त्या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या, असं संजय शिरसाट म्हणालेत.
‘त्या’ भेटीवर शिरसाट यांची प्रतिक्रिया
शरद पवार आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या पुण्यात भेट झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यावर संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकर प्रगल्भ आहेत. त्यांना कळतं की कुणाला भेटायचं, कुणाला नाही ते.ते म्हणाले आहे युती करा, मात्र युती झाली नाही तर ते त्यांना जागा दाखवतील. मी सांगतोय आघाडी होणार नाही. नहाविकास आघाडीवाले लोक प्रकाश आंबेडकर यांना यांची जागा दाखवतील, असं शिरसाट म्हणालेत.
राऊतांवर निशाणा
संजय राऊत यांना सध्या पार्टीमध्ये जाण्याची अडचण झाली असेल. त्यांना योग्य माहिती आहे पार्टी कुणी सुरू केल्या त्यांचे एक नेते कर्जत वगैरे ला पण जातात, जाऊ द्या.आम्हाला करून घ्यायची आहे आम्ही स्वच्छ होऊ. मात्र जे तुंबलेले आहेत , ज्यांना प्रश्न कळत नाही खरी डिप क्लिन तर आता त्यांचीच होणार आहे. संजय राऊतवर बोलून तोंड घाण होतं. वर्षाचा शेवट चांगला करू. महाराष्ट्र सोन्याने मढवलेली आहे हा आंधळा आहे याला दिसत नाही. महाराष्ट्र संपन्न राज्य आहे. मात्र याला फाटके दिसतेय, असं म्हणत संजय शिरसाट यांनी संजय राऊतांवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.