भिडे गुरुजी स्वतंत्र व्यक्ती, त्यांचा कोणत्याही पक्षाशी संबंध नाही, पण…; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावर शिंदे सरकारमधील मंत्र्याची प्रतिक्रिया
Deepak Kesarkar on Sambhaji Bhide Statement About Mahatma Gandhi : भिडे गुरुजी शिवरायांचा इतिहास लोकांपर्यंत पोहोचवतात; शिंदे सरकारमधील मंत्र्याचं वक्तव्य चर्चेत
छत्रपती संभाजीनगर | 29 जुलै 2023 : संभाजी भिडे यांचं वादग्रस्त वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडे यांनी एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे वादंग निर्माण झालं आहे. ठिकठिकाणी निदर्शनं केली जात आहेत. संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा, या मागणीवरून काँग्रेस आक्रमक झाली आहे. त्यावर आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भिडे गुरुजी स्वतंत्र आहेत. ते कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. ते मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांची माहिती देतात. त्यांच्या आणि कोणत्याही पक्षाचं काहीही देणंघेणं नाही. त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे. गृहखातं यावर चौकशी करून आवश्यक तो निर्णय घेईल, असं दीपक केसरकर म्हणालेत.
काँग्रेस आक्रमक
महात्मा गांधी विरोधात संभाजी भिडेंनी वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भिडेंना अटक करण्याची मागणी केली आहे. तर आज अमरावतीत काँग्रेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात काँग्रेस करणार संभाजी भिंडे विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आलं. संभाजी भिडे यांना अटक करण्याची काँग्रेसची मागणी आहे.
राष्ट्रवादीचं आंदोलन
संभाजी भिडेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले आहेत. महात्मा गांधींबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे संभाजी भिडेंच्या निषेधार्थ राष्ट्रवादी आंदोलन करत आहे. पुण्यात हे आंदोलन केलं जात आहे.
दीपक केसरकर यांनी शालेय प्रश्नांवरही भाष्य केलं. प्रत्येकाला मुंबईला बोलावणं शक्य नाही. म्हणून विभागीय स्तरावर मी भेट देतोय. प्रत्येक जिल्ह्यात जाण्याचा विचार आहे. पण महाराष्ट्रात खूप मोठा आहे. त्यामुळे विभागीय स्तरावर बैठकीत शैक्षणिक क्षेत्रातील अडचणी जाणून घेत आहोत, असं केसरकर म्हणाले.
आम्ही मुलांची मानसिक टेस्ट घेऊन त्यांचे समुपदेशन करु. सहावीपासून या टेस्ट आम्ही सुरू करत आहोत. मुलांना मोबाइल सोडून वाचायची आवड निर्माण व्हावी यासाठी आम्ही नवीन उपक्रम घेऊन येत आहोत. याची सुरुवात मुंबईतून करण्यात आली आहे.लहान मुलांमध्ये वाढत्या हिंसेविरोधात आम्ही बालकल्याण समितीसोबत करार केला आहे. ते मुलांची चाचणी घेऊन समुपदेशन करतील, अशी माहिती केसरकर यांनी दिली आहे.
सध्या युती सरकारमध्ये राष्ट्रवादीतील आणखी काही नेते सामील होणार असल्याची चर्चा आहे. त्यावर कोण कोणत्या पक्षात जाईल हे आताच सांगितलं तर ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही!, असं केसरकर म्हणालेत.
मुसळधार पावसामुळे शेतीचं नुकसान झालंय. हे निर्सगामुळे झालं आहे. सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असंही केसरकर यावेळी म्हणाले.