विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याला काँग्रेसचा पाठिंबा आहे की नाही?; नाना पटोले म्हणाले…
Nana Patole on Vijay wadettiwar Statement about Hemant Karkare : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी 26/11 हल्ल्यावर भाष्य केलं आहे. हेमंत करकरे यांच्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी महत्वाचं विधान केलं आहे. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्याला काँग्रेसचा? नाना पटोले काय म्हणाले? वाचा...
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 26/11 मुंबई हल्ल्यावर भाष्य केलं आहे. शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या मृत्यूवर संशय व्यक्त केला आहे. आरएसएस समर्थक अधिकाऱ्याने हेमंत करकरे यांना गोळी घातली, असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. त्यावरून आता राजकारण तापलं आहे. विजय वडेट्टीवार यांची भूमिका हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केलं आहे. 26/11 बाबत सरकारने भूमिका मांडावी. ती आधीच मांडायला हवी होती. विजय वडेट्टीवार यांनी मांडलेली भूमिका वैयक्तिक आहे. ती पक्षाची भूमिका नाही, आमची ती भूमिका नाही, असं नाना पटोले म्हणाले.
निवडणुकीवर नाना पटोले म्हणाले…
येणाऱ्या निवडणुकीत लोकांचा भाजपवरील राग दिसेल. महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार जिंकतील विश्वास आहे. पंतप्रधानांनी गल्लोगल्ली फिरावं, हे शोभत नाही. राजीनामा देऊन त्यांनी फिरावं. ज्या पदावर बसले आहेत. त्या पदाला न्याय देणे ही तुमची भूमिका असावी दिशाभूल करू नये, असंही नाना पटोले म्हणालेत.
पटोलेंचा भाजपवर निशाणा
निवडणूक आयोग प्रामाणिक असेल तर भाजपवर कारवाई व्हावी. नियमांची अंमलबजावणी होत नाही. भाजपच्या जाहिराती बघा काय लेव्हलवर ते जातायेत. इंडिया आघाडी निवडून आली तर पाकिस्तानात जल्लोष…, असं हे लोक म्हणतात. पण हेच पाकिस्तान धार्जिने आहेत का असा प्रश्न पडतो. त्या जाहिरातीबाबत आम्ही भाजपची तक्रार केलीय. सदाभाऊ खोत, एकनाथ शिंदे , अशोक चव्हाण आता तिकडे गेलेले हे सगळे अग्निवीर आहेत. त्यांना ना पेन्शन, ना शाहिद प्रमाणपत्र… ही मंडळी स्वार्थासाठी बोलतात. राजकीय अग्निवीर योजना आहे, असं नाना पटोले म्हणालेत.
नरेंद्र मोदींवर टीका
नरेंद्र मोदी हे नटसम्राट आहेत. ते कधी काय बोलतील नेम नाही. असं बोलून त्यांच्या मतांची टक्केवारी कमी करण्याचा प्रयत्न आहे. दुसरं हरले तर बुडणाऱ्याला तेवढाच सहारा… मोदीच्या सभेला गर्दी 300 रुपये 500 रुपये दिले जातात. पुण्यात तर माणसाचा 4 हजार भाव होता. खोटं बोला पण रेटून बोला असे आमच्या फडणवीससाहेबांचं म्हणणं आहे, असं नाना पटोले म्हणालेत.