Marathi News : संभाजीनगराने वाढवली भारताची लोकसंख्या?; नेमकी काय भानगड आहे?
भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकलं आहे. भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 29 लाखांनी अधिक आहे. येत्या वर्षभरात ही संख्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. भारताच्या वाढत्या लोकसंख्येला संभाजीनगर जिल्हाही कारणीभूत असल्याचं दिसून आलं आहे.
संभाजीनगर : लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकलं आहे. भारताची लोकसंख्या 142.86 कोटी झाली आहे. तर चीनची लोकसंख्या 142.57 कोटी आहे. भारताची लोकसंख्या चीनपेक्षा 29 लाखांनी जास्त झाली आहे. 1950 नंतर पहिल्यांदाच भारत लोकसंख्येच्या बाबतीत चीनच्या पुढे गेला आहे. पुढच्या वर्षापर्यंत भारताची लोकसंख्या अधिक वाढण्याची शक्यताही संयुक्त राष्ट्र संघाने वर्तवली आहे. मात्र भारताच्या या वाढत्या लोकसंख्येत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा सर्वाधिक वाटा असल्याचं निष्पन्न झालं आहे.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एका वर्षात पाऊण लाख बाळांचा जन्म झाला आहे. लोकसंख्येत भारताला एक नंबरवर आणण्यामध्ये छत्रपती संभाजी नगरचा सुद्धा मोठा वाटा असल्याचं यावरून स्पष्ट झालं आहे. संभाजीनगरात गेल्या चार वर्षांपासून वर्षभरात जन्मणाऱ्या बालकांची संख्या साडेतीन हजारांनी वाढली आहे. दररोज 200 आणि महिन्याकाठी 5000 ते 6000 मुलांचा छत्रपती संभाजी नगरात जन्म होत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे भारताच्या वाढत्या लोकसंख्येत संभाजीनगराचाही मोठा वाटा असल्याचं अधोरेखित झालं आहे.
संभाजीनगरची लोकसंख्या वाढतेय
संभाजीनगरातील एकूण लोकसंख्या 40 लाखांच्या दिशेने जात आहे. संभाजीनगरची लोकसंख्या सध्या 37 लाख 1 हजार 282 एवढी आहे. यात 19 लाख 24 हजार 469 पुरुष आहेत. तर 17 लाख 76 हजार 813 स्त्रियांचा समावेश आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येत महिलांची संख्या एक लाख 47 हजार 656 ने कमी आहे.
रिपोर्टमध्ये काय म्हटलंय
एनएफपीएच्या ‘द स्टटे ऑफ वर्ल्ड पॉप्युलेशन रिपोर्ट 2023’ने बुधवारी लोकसंख्येबाबतचा आपला रिपोर्ट जारी केला. ‘8 बिलियन लाइव्हस, इनफिनिटी पॉसिबिलिटीज : दे केस फॉर राइट्स अँड चॉइस’ या नावाने हा रिपोर्ट जाहीर झाला आहे. त्यात भारताची लोकसंख्या चीनपेक्षाही अधिक असल्याचं सिद्ध झालं आहे. दोन्ही देशातील लोकसंख्येत फार कमी अंतर आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या बाबतीत दोन्ही देशांची तुलना करणं कठिण असल्याचं यूएनएफपीएचे मीडिया सल्लागार अन्ना जेफरीज यांनी सांगितलं.
भारतात कुणाची संख्या अधिक
भारतात 25 टक्के लोक शून्य ते 14 वयोगटातील आहेत. 18 टक्के मुलं 10 ते 19 वयोगटातील आहेत. 10 ते 24 वयोगटातील तरुणांची संख्या 26 क्के आहे. तर 15 ते 65 वयोगटातील लोकांची संख्या 68 टक्के आहे. 65 वर्षाच्यावरील 7 टक्के लोक देशात आहेत.