‘शरद पवार यांच्यासोबत बसलो आणि म्हणालो…’, रावसाहेब दानवे नेमकं काय म्हणाले?
"२५ निवडणुका लढवल्या. प्रत्येक निवडणूक ताकदीने लढलो. त्यामुळे माझ्यासाठी निवडणूक सोपी म्हटलं तर चुकीचं आहे. मी फॉर्म भरला तर कार्यकर्ते कामाला लागतील. मागच्या लोकसभेत बाहेर फिरलो नाही. तब्येत खराब झाल्याने दवाखान्यात होतो. जालन्यातील एक आमदार सोडला तर सर्व आमदार कार्यकर्ते आमचे आहेत", असं रावसाहेब दानवे म्हणाले.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी विविध विषयांवर मनमोकळेपणाने प्रतिक्रिया दिली. “मी प्रचाराची सुरुवात निवडणूक म्हणून करत नाही. मात्र निवडणूक म्हणून लोकांना वाटतं, उमेदवार आला पाहिजे. माझा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. लोकांचं मत आहे. कल्याण काळे अगोदरही माझ्या विरोधात लढले. त्यावेळी मतांचं अंतर कमी होतं. मात्र सहाचे सहा आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे होते. त्यांचं केंद्रात आणि राज्यात सरकार होतं. अशा परिस्थितीत मी टक्कर दिली. त्याचा परिणाम असा झाला, मतांची मार्किंग कमी राहिली. मात्र ती काँग्रेस अन् ती भाजप आता राहिली नाही. आता खूप बदल झाले आहेत. कल्याण काळे यांनी निवडणूक लढवली. त्यावेळचे 80 टक्के कार्यकर्ते भाजपमध्ये आहेत. आमचा जाफराबादचा एक राजेश चव्हाण नावाचा कार्यकर्ता आहे. त्याला काँग्रेसचा फोन आला आणि काम करा म्हणाले. काँग्रसने भ्रमात राहू नये”, असा टोला रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसला लगावला.
“२५ निवडणुका लढवल्या. प्रत्येक निवडणूक ताकदीने लढलो. त्यामुळे माझ्यासाठी निवडणूक सोपी म्हटलं तर चुकीचं आहे. मी फॉर्म भरला तर कार्यकर्ते कामाला लागतील. मागच्या लोकसभेत बाहेर फिरलो नाही. तब्येत खराब झाल्याने दवाखान्यात होतो. जालन्यातील एक आमदार सोडला तर सर्व आमदार कार्यकर्ते आमचे आहेत. सभेचे नियोजन राज्य पातळीवर होत आहे. आमच्याकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येतील”, असं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
‘२८ व्या वर्षी आमदार, ४२ व्या वर्षी खासदार झालो’
“आम्ही ग्रामीण भागातले मुल होतो. २८ व्या वर्षी आमदार, ४२ व्या वर्षी खासदार झालो. लोकसभेत पहिल्यांदा निवडून गेलो तेव्हा ९० खासदार टोपी घालून येत होते. आता पाचव्यांदा निवडून गेलो तेव्हा एक-दोन दिसतो. विजयराज सिंधिया, मुलगी वसुंधरा, मुलगा दुष्यंत यांच्यासोबत खासदार होतो. बाळासाहेब विकी, राधाकृष्ण आता सुजय सोबत खासदार होतो. अगोदर जुनेजाणते होते. आता नवीन पिढीसोबत मी लोकसभेत आहे”, असं रावसाहेब दानवे म्हणाले.
‘शरद पवार यांच्यासोबत बसलो आणि म्हणालो…’
“आमच्यासारख्याला विचारलं तर पहिला काळ चांगला होता. पहिल्या विधानसभेत 60 हजारात आमदार झालो. निवडून आलो तर 1 हजार असा वेगवेगळा निधी मिळत होता. शरद पवार आणि मी सोबत बसलो. त्यांना मी म्हणालो, 60 हजारात आमदार झालो. ते म्हणाले मी 12 हजारात झालो. ते कसं तर लोकच निवडणूक लढवत होते. अगदी कमी लोक 7-8 टर्म झालेली लोकं आहेत. महाराष्ट्रात मात्र मी एकटा आहे. जयप्रकाश यांचं आंदोलन, टीकेत, अण्णा हजारे आता मराठा आरक्षण मुद्दा आहे. अनेक आंदोलनं आम्ही बघितली आहेत”, असं दानवे म्हणाले.
“आंब्याच्या झाडाला दगड मारतात, बाभाळीला दगड मारत नाही. काँग्रेस वाल्यांना चॅलेंज आहे त्यांची चर्चा करावी. मी अनेक विकासाची कामे केली. मी विकासावर निवडणूक लढवत आहे. टीका करू द्या. मी उत्तर देत नाही. मी भविष्यकार नाही. मागच्या काळात साडेतीन लाख मतांनी निवडून आलो. यावेळी 4 लाख मतांनी निवडून येईल”, असा विश्वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.