शरद पवार यांनी राज ठाकरेंची उडवली खिल्ली; म्हणाले, लोकांनी त्यांना फक्त…
Sharad Pawar on Raj Thackeray : छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना शरद पवार यांनी राज ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. त्याचबरोबर आगामी विधानसभा निवडणुकीवरही शरद पवार बोलले आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणावरही शरद पवार बोलले आहेत. शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय? वाचा सविस्तर...
दोन दिवसांपूर्वी मुंबईत मनसेचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे 200 ते 250 जागा लढवणार आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही लोकं काही करून सत्तेत बसवायचे आहेत. काहीही करून. अनेक लोकं हसतील. हसू दे. मला काही हरकत नाही. पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सर्वच जण आम्ही तयारीला लागलो आहोत, असं राज ठाकरे म्हणाले. याबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा चांगली गोष्ट आहे. मागच्यावेळी अशीच भूमिका घेतली. लोकांनी नाही घेतली. लोकांनी त्यांना एकच जागा दिली, असं शरद पवार म्हणाले.
आरक्षणाबाबत काय म्हणाले?
आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा राज्य सरकार, राज्याचे प्रमुख मार्ग काढत असेल तर त्यांना हातभार लावणं हे महत्त्वाचं आहे. दिल्लीत जाऊन काही होणार नाही. प्रश्न इथला आहे. इथचं सोडवला पाहिजे, असं शरद पवार म्हणालेत.
50 टक्क्यांच्यावर आरक्षणाची मर्यादा न्यावी आमच्या लोकांनी सूचना केली आहे. पण हा राज्याचा प्रश्न आहे. संसदेतील लोकांनी हा मुद्दा मान्य केला पाहिजे. तरच त्यातून मार्ग निघेल. त्यावर अजून काही चर्चा केली नाही. राज्याचं एक वैशिष्ट्ये आहे. कुठे काही झालं तर त्याला जबाबदार शरद पवार आहे असं म्हटलं जायचं. लातूरला भूकंप झाला तरी त्याला शरद पवारच जबाबदार आहेत अशी चर्चा त्याकाळी होती. सीनिअर लोकांना माहीत असेल. तुम्हाला माहीत नाही, असं पवार म्हणाले.
त्या नेत्यांना पुन्हा पक्षात घेणार?
अजित पवार गटातील लोकांना पुन्हा पक्षात घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा काही लोकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्याचा सरसकट निर्णय घेण्याची मनस्थिती आमची नाही. जे लोक विचाराने आमच्यासोबत होते. एकत्र काम करण्याची मानसिकता ज्यांची आहे. त्यांच्याबद्दल विरोध करण्याची गरज नाही. ज्यांनी टोकाची भूमिका घेतली होती, त्याचा विचार आमच्या पक्षात होईल. त्यानंतर अंतिम निर्णय होईल, असं शरद पवार म्हणाले.