धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, छत्रपती संभाजीराजे यांची मागणी, बीड पॅटर्नबाबत केले मोठे विधान
Chhatrapati Sambhaji Raje on Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणात छत्रपती संभाजीराजे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यांनी बीडच्या गुन्हेगारी पॅटर्नबाबतही मोठे वक्तव्य केले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आता वातावरण ढवळून निघाले आहे. याप्रकरणात धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराड यांचे नाव घेण्यात येत आहे. कराडांना अद्याप अटक होत नसल्याने वातावरण तापले आहे. बीडमध्ये आता मोर्चाला सुरुवात होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गर्दी होत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीराजे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांनी बीडच्या गुन्हेगारी पॅटर्नबाबतही मोठे वक्तव्य केले आहे.
19 दिवस उलटले आरोपी मोकाट
‘संतोष देशमुख यांनी क्रूर हत्या झाली, महाराष्ट्र मध्ये भीषण परिस्थिती झाली आहे, मला बोलायला लाज वाटते महाराष्ट्राचे बीड झालं आहे, 19 दिवस झाले अजून अटक नाही, वाल्मिक कराड बेपत्ता आहे’, असा घणाघात छत्रपती संभाजीराजे यांनी केला. त्यांनी आरोपी अटक होत नसल्याने संताप व्यक्त केला.
अजितदादांवर टीका
यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी अजितदादांवर जहाल टीका केली. अजित दादा परखड म्हणता मग त्यांना संरक्षण देताय, ते तुम्हाला पटतंय का, असा सवाल त्यांनी केला. महाराष्ट्र मध्ये काय चालले आहे, असा प्रश्न त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कौशल्य दाखवा, खऱ्या आरोपीला अटक करून दाखवा.कराड याला संरक्षण देणारे तिथले मंत्री यांची हकालपट्टी का झाली नाही? त्यांचा राजीनामा का घेतला नाही? हा आमचा सवाल आहे, असे ते म्हणाले. या मोर्चाला जातीय वळण नाही, हा सर्वधर्मीय मोर्चा आहे, असे त्यांनी वक्तव्य केले.
धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या
अशी प्रकरण राज्याला परवडणारे आहे का, असा सवाल त्यांनी केला. स्वत:: पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत वाल्मिक शिवाय धनंजय मुंडे यांचे पान हलत नाही. बीडमध्ये जे चाललं आहे ते तुम्हाला पटते का. बीडची गुन्हेगारी पाहून मी चकित झालो, स्वत: मुंडे यांचा हातात बंदुक घेऊन फोटो आहे, हे काय दहशत माजवण्याचा प्रकार आहे का? त्यांना मंत्रिपद देऊ नका असे माझे म्हणणे होते. धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड कुठं आहे हे माहिती नसणे हे पटणारे नाही. मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
बीड पॅटर्न कुठेच घडू नये
राज्यात हा बीड पॅटर्न कुठं होऊ नये याची दक्षता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घ्यावी, अशी मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली. सरपंचाची हत्या होत आहे. आरोपींचा थेट संबंध दिसून येतो. त्यांचा कंपनीत भागीदारी आहे, त्यांचे सातबारा पुढे आले आहे, असे ते म्हणाले.