MIM ची उद्धव सेनेच्या मांडीला मांडी? महाविकास आघाडीत होणार एंट्री, महायुतीला रोखण्यासाठी नवी रणनीती? इम्तियाज जलील यांचा प्रस्ताव काय?
Mahavikas Aaghadi Imtiaz Jalil : महाविकास आघाडीत शिरकाव करण्यासाठी एमआयएम तडजोड करण्यासाठी तयार आहे. एमआयएमने यापूर्वी अनेकदा महाविकास आघाडीकडे मोठ्या आशेने पाहिले. लोकसभेत त्याचा काही परिणाम झाला नाही. पण विधानसभेसाठी गणित बदलू शकतं का?
महायुतीला या विधानसभेत घरी पाठवण्यासाठी महाविकास आघाडी MIM ला सोबत घेणार का? असा प्रश्न राज्यात विचारण्यात येत आहे. कारण हाविकास आघाडीत शिरकाव करण्यासाठी एमआयएम तडजोड करण्यासाठी तयार आहे. एमआयएमने यापूर्वी अनेकदा महाविकास आघाडीकडे मोठ्या आशेने पाहिले. लोकसभेत त्याचा काही परिणाम झाला नाही. पण विधानसभेसाठी गणित बदलू शकतं का? काय आहे रणनीती? दोन टोकाचे विचार असणारे शिवसेना आणि एमआयएम एकाच मंचावर दिसतील का? या प्रश्नाची उत्तरं विधानसभेपूर्वी मिळतील.
भाजपला हरवण्यासाठी एकत्र या
आम्ही महविकास आघाडीला प्रस्ताव दिलंय, मात्र किती जागा याबाबत काहीही बोललो नाही, २ महिन्यापूर्वी आम्ही त्यांना म्हणालो होतो की भाजपला हरवायचे असेल तर आपल्याला एकत्र यावे लागेल, शरद पवार यांचे पीए आणि नाना पटोले, अमित देशमुख यांना 10 सप्टेंबरला प्रस्ताव पाठवला आहे. तुम्ही हो म्हणाल तर आपण सोबत बसून जागा ठरवू असे आम्ही म्हटले आहे, आमची यादी तयार आहे, आम्ही ५ जागा आधीच जाहीर केल्या आहेत. आम्ही कुठलीही तडजोड करायला तयार आहोत. आम्हाला राज्यात महायुती नको म्हणून आम्ही तडजोड करू अशी आमची तयारी आहे, असे एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस-राष्ट्रवादीला दिला प्रस्ताव
मुस्लिम बहुल जागांवर महाविकास आघाडी मुस्लिम उमेदवार देणार त्यातून एमआयएम आणि महाविकास आघाडी यांच्या उमेदवारामध्ये मत विभागणी होईल. त्यातून महायुतीला फायदा होईल म्हणून आमचा असा प्रस्ताव आहे. आमची मागणी अवास्तव नाही. शरद पवार, काँग्रेसच्या नेत्यांना सांगतोय मी कबुतरा मार्फत प्रस्ताव पाठवला नाही, मी आपल्या पीएजवळ, आपल्याला e-mail ने प्रस्ताव पाठवला आहे, असे जलील म्हणाले.
उद्धव सेनेबाबत काय मत
शिवसेना ही नवी सेक्युलर झालेली पार्टी आहे. त्यांच्या काही अडचणी आहेत. त्यांचे अनेक मुद्दे आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्ही एनसीपी आणि काँग्रेस पक्षाला प्रस्ताव दिलाय, हे इम्तियाज जलील यांनी सांगितले. म्हणजे त्यांनी उद्धव सेनेला वगळून इतर दोन पक्षांना हा प्रस्ताव पाठवलेला आहे. जलील यांना दोन्ही पक्ष त्यांना सोबत घेतील अशी आशा आहे. महाविकास आघाडीने आम्हाला सोबत घ्यायचे की नाही हे एकदा स्पष्ट करावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.
अंबादास दानवे यांनी स्पष्ट सांगावे आम्ही कुठले देश विघातक कृत्य केले. देश विघातक कृत्य तर आपले नेते बाळासाहेब ठाकरे यांनी केले होते, म्हणून त्यांना ६ वर्ष मतदानासाठी बंदी घातली होती आणि आम्ही काही केले असेल तर अडीच वर्ष आपली सत्ता होती. आमच्यावर का कारवाई केली नाही. पुरावे असेल तर वेळ घालवू नका आमच्यावर कारवाई करायला सांगा. घराजवळ पोलीस स्थानक आहे तिथं जाऊन गुन्हा दाखल करा, असे जलील म्हणाले.