“केंद्रात, राज्यात तुमचंच सरकार, घोषणाही तुम्हीच केली मग…”, अरबी समुद्रातील शिवस्मारकावरुन छत्रपती संभाजीराजेंचा सवाल
मी बोट चालकांना सुरक्षेच्या दृष्टीने जिथे जाण्यास परवानगी नाही, तिथे जायच नाही, हे आधीच सांगितलेले आहे. आम्ही दुर्बिणीने स्मारकाचे काम पाहू. तिथून अभिवादन करु, असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
Sambhaji Raje Angry on BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्यदिव्य स्मारक बांधू अशी घोषणा केली होती. यानंतर त्यांनी मोठ्या थाटामाटात जलपूजन सोहळाही पार पडला होता. मात्र अद्याप या स्मारकाचे काम सुरु झालेले नाही. याच मुद्द्यावरुन आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वशंज आणि स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती संभाजीराजे हे आज अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करणार आहेत. नुकतंच ते मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी संभाजीराजेंनी जोरदार भाषण करत भाजपवर टीका केली.
छत्रपती संभाजीराजे काय म्हणाले?
“छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. त्यांचे स्मारक उभं राहत असेल तर ती अतिशय आनंदाची बाब आहे. २०१६ ला जलपूजन झालं. समिती स्थापन झाली. एल अँड टीला कंत्राट देण्यात आला. मी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यां सर्व मुख्यमंत्र्यांशी याबद्दल चर्चा केली. या सर्वांना तुम्ही या स्मारकाचे काम का सुरु करत नाही, असे विचारले. त्यावर मला कोणीच व्यवस्थित उत्तर दिले नाही”, असा आरोप छत्रपती संभाजीराजेंनी केला. ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात बोलत होते.
“माझ्या पोलिसांना सूचना आहेत की तुम्ही दडपशाही करत असाल, मग आम्हालाही निर्णय घ्यावा लागेल. आम्हाला कोणताही कायदा हातात घ्यायचा नाही. आम्ही आंदोलनसाठी इथे आलेलो नाही. कायद्याच्या बाहेर जाऊन कोणतीही गोष्ट करायची नाही. गडकोट किल्ल्यांसाठी ते आपले जीवन स्मारक आहेत. ते जीवन स्मारक जिवंत राहावेत यासाठी गेली १५ ते २० वर्ष मेहनत करत आहे. दुर्गराज रायगड किल्ल्याचे संवर्धन स्वातंत्र्य मिळाल्यानतंर ७५ वर्षांनी सुरु झाले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचे एक मोठे स्मारक व्हावे, अशी त्यावेळी अनेक पुढाऱ्यांची इच्छा होती, याचे मी खरंच कौतुक करतो. राजर्षी शाहू महाराजांनी या स्मारकाची इच्छा पहिल्यांदा व्यक्त केली होती. त्यांनी या स्मारकाचा पूर्ण खर्च आमची संस्था करेल, असेही सांगितले होते. पण त्यानंतर राजकीय परिस्थिती काय झाली, काय घडलं, यात मला जायचं नाही.” असे छत्रपती संभाजीराजेंनी म्हटले.
गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभं राहिलं, मग महाराष्ट्रात का नाही
“त्यानंतर अनेकांनी याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. सुशीलकुमार शिंदे यांनी घोषणा केली. अशोक चव्हाणांनी त्यांच्या जाहीरनाम्यात याबद्दल सांगितले होते. पण त्यानंतर विषय पाण्यात गेला. यानंतर भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात अरबी समुद्रात एक स्मारक उभारु असे सांगितले. २०१६ रोजी म्हणजेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी संधी साधून घाई गडबडीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते हे जलपूजन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा जलपूजन करण्यासाठी येतात, तेव्हा याचा अर्थ काय असतो की तुमच्याकडे सर्व परवानग्या असल्या पाहिजेत. त्याशिवाय कोणताही पंतप्रधान येत नाही. मोदींनी जलपूजन केले, मीही तिथे हजर होतो. मला अभिमान वाटला. गडकोट किल्ल्याचे संवर्धन व्हायलाच हवं. पण अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक व्हायला हवे, ही भूमिका होती. गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मारक उभं राहिलं. मला तुलना करायची नाही”, असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
“मला कोणीच व्यवस्थित उत्तर दिले नाही”
“पण छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत. त्यांचे स्मारक उभं राहत असेल तर ती अतिशय आनंदाची बाब आहे. २०१६ ला जलपूजन झालं. समिती स्थापन झाली. एल अँड टीला कंत्राट देण्यात आला. मी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यां सर्व मुख्यमंत्र्यांशी याबद्दल चर्चा केली. या सर्वांना तुम्ही या स्मारकाचे काम का सुरु करत नाही, असे विचारले. त्यावर मला कोणीच व्यवस्थित उत्तर दिले नाही. तुमचं केंद्रात सरकार आहे, तुमचं राज्यात सरकार आहे.
तुम्हीच घोषणा केली. तुम्हीच जलपूजन केले. २८०० कोटी रुपये जाहीर केले. समिती स्थापन केली. एलअँडटीला कंत्राट दिले, पण आज तिथे काय झालंय, हे आपल्याला माहिती नाही. मी शिवरायांना त्यावेळी अभिवादन केले. पण आता तिथे स्मारक झालंय की नाही, हे समजण्यासाठी तिथे जायला हवं. जर ते झालं असेल तर मग आम्ही तिथे जाऊन अभिवादन करु”, असे संभाजीराजेंनी म्हटले.