विरोधी पक्ष आता कुठाय? विधानसभा आलीय म्हणून मराठा नकोय का?; संभाजी राजे यांचा सवाल
मला फोकस हलवायचा नाही. तुम्हाला जराही गांभीर्य नसेल तर सत्तेत राहून तुमचा उपयोग काय? असा सवाल संभाजीराजेनी उपस्थित केला.
Sambhaji Raje Meet Manoj Jarange Patil : मराठा सामाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. गेल्या सात दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे उपोषण करत आहेत. जालन्यातील अंतरवली सराटीत त्यांचं उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांची तब्ब्येत खालवली आहे. यामुळे स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे अंतरवली सराटीमध्ये पोहचले आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर संभाजीराजे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यासंह विरोधकांवरही टीका केली. विरोधी पक्षातील नेतेही बघ्याची भूमिका घेत आहेत. हे चालणार नाही. हे तुमचं कॅबिनेट आहे ना… घ्याना निर्णय मग. हो की नाही बोलून टाका, असे संभाजीराजे म्हणाले.
“सरकार निवांत मुंबईत”
“मनोज जरांगे पाटील हे या वर्षात सहाव्यांदा आंदोलन आणि आमरण उपोषणाला बसले आहेत. राज्यातील इतिहासातील शरमेची बाब आहे. एक व्यक्ती समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीवाची बाजी लावायला बसला आहे. त्याची दखल किंबहूना त्यावरचा निर्णय या सरकारने घेतलेला नाही. मी डॉक्टर्सकडून सर्व रिपोर्ट घेतले आहेत. परवा रायगडवर मी गेलो होतो. त्यावेळी मला कळलं की मनोज जरांगे यांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे मी त्यांना पाहण्यासाठी प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो आहे. त्यांचा जीव तुमच्यासाठी आहे. त्यांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी त्यांना पाहायला आलोय. मला दु:खी वाटतं. वेदना होत आहे. एवढी तब्येत खालावूनही… आता तर त्यांनी सलाईन घ्यायचं बंद केलं आहे. सरकार निवांत मुंबईत एअर कंडिन्शन्स ऑफिसात बसले आहेत”, असा आरोप संभाजीराजेंनी केला.
आज आलो आणि उद्याही येणार
“विरोधी पक्षातील नेतेही बघ्याची भूमिका घेत आहेत. हे चालणार नाही. हे तुमचं कॅबिनेट आहे ना… घ्याना निर्णय मग. हो की नाही बोलून टाका. ही काय पद्धत आहे. इथले मेडिकल रिपोर्ट जातात तिकडे. मेडिकल रिपोर्ट वाईट आहेत. काही होऊ शकतं. त्याला तुम्ही जबाबदार असणार आहात. मनोज जरांगेंना काय सांगायचं ते सांगितलं. तब्येतीच्या बाबत चर्चा झाली. त्यांनी मला शब्दही दिलाय. मी दोघांना जबाबदार धरतो. पहिलं सरकारला आणि नंतर विरोधी पक्षांना. तुम्ही एकत्र या आणि आरक्षण द्यायचं की नाही ते ठरवा. पलिकडे बसून मनोज दादा मनोजदादा म्हणता. हे काही बरोबर नाही. राज्याच्या इतिहासात हे पहिलं आंदोलन होत आहे. हे सामान्यांचं आंदोलन आहे. मनोज जरांगे यांचा लढा प्रामाणिक असतो. मी पूर्वी आलो होतो, आज आलो आणि उद्याही येणार”, असेही संभाजीराजेंनी म्हटले.
बहुजन समाज नको का?
“मी सरकारला सांगू इच्छितो की, ज्या शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं, त्यात मराठा समाजाचा समावेश होता. तुम्ही फुले शाहू शिवाजी आंबेडकरांचं नाव घेतो तर मराठ्यांना आरक्षण द्या. मी पूर्वी जरांगेंसोबत होतो. आजही आहे. उद्याही राहील. आज बऱ्याच गोष्टी मी बोलू शकतो. पण मला फोकस हलवायचा नाही. तुम्हाला जराही गांभीर्य नसेल तर सत्तेत राहून तुमचा उपयोग काय. विरोधी पक्षातील नेत्यांना सांगायचं वर्षभरापूर्वी पटापट आले. आता कुठे आहात? राजकारणाची वेळ आली, विधानसभा आली म्हणून जरांगे नकोय का? मराठा समाज नको का? बहुजन समाज नको का? हे अजिबात चालणार नाही”, असेही संभाजीराजे म्हणाले.